गैरसमज तरुणीचा; मार मात्र निर्दोष तरुणाला

पिंपरी (प्रतिनिधी) – दुपारच्या कडक उन्हात तो सायकलवरून नोकरीला निघाला होता… कानात हेडफोन घालून मोबाइलवर मनोरंजनाचा कार्यक्रम ऐकत चालला होता… कॉमेडी ऐकून त्याला हसू आले आणि ते हास्य त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरले… हा तरुण आपल्याकडे पाहून हसला आणि पुढे थोड्या अंतरावर जाऊन थांबला. म्हणजे त्याने आपली छेडच काढली, असे एका तरुणीला वाटले आणि तिने मित्रांना बोलवून घेत त्या तरुणाची येथेच्छ धुलाई केली. एवढेच नव्हे तर त्या तरुणाचे दुचाकीवरून अपहरण केले. मात्र पोलिसांना याबाबत वेळीच माहिती मिळाल्याने त्या तरुणाची सुटका केली.
दुपारच्या रणरणत्या उन्हात सेंकडशीपसाठी एक परप्रांतीय कामगार तरुण सायकलवर केशवनगर, चिंचवड येथील रस्त्याने चालला होता. मनोरंजनासाठी त्याने कानात हेडफोन लावले होते. आपल्या भाषेतील कार्यक्रम तो ऐकत चालला होता. त्यावेळी कार्यक्रमात हास्यविनोद झाल्याने तो तरुण हसला. मात्र तिथे उभ्या असलेल्या एका तरुणीचा गैरसमज झाला की ता आपल्याकडे बघूनच हसला. काही अंतर गेल्यावर तो तरुण झाडाखाली सावलीमध्ये थांबला. मात्र तो आपली छेड काढायलाच थांबाल्याचे त्या तरुणीला वाटले आणि तिने फोन करून आपल्या मित्राला बोलविले. तिथे जवळच असलेले तिचे मित्र पोहचले आणि सायकलने चाललेल्या त्या तरुणाला अडवून मारण्यास सुरवात केली.
आसपासच्या नागरिकांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला विरोध केला. मात्र भर उन्हात ते मारहाण करीतच होते. एवढ्यावर मारहाण करणारे थांबले नाहीत. त्यांनी दुचाकीवरून त्या तरुणाचे अपहरण केले. मात्र याबाबत चिंचवड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेतला व तीन आरोपींना पोलीस चौकीत आणले.
पोलीस चौकीत आणल्यावर सखोल चौकशी केली असता आपल्याला छेडल्याचा गैरसमज झाल्याचे तरुणीने सांगितले. त्या तरुणाच्या शरीरावर बेदम मारहाण झाल्याचे वळ स्पष्ट दिसत होते. मात्र हा तरुण तक्रार देण्यास तयार नव्हता. पोलिसांनी त्याला समजावले असता तो म्हणाला पोट भरण्यासाठी घर गाव सोडून एवढ्या लांब आलो आहे. रोज त्याच रस्त्याने जायचे-यायचे आहे. त्यामुळे कोणाशी दुश्मनी नको. अखेर कोणाचीही तक्रार नसल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तीन तरुणांना आपल्या खास शैलीत समज आणि पुन्हा असे न करण्याच्या कडक सूचना देऊन सोडून दिले.





