लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार; 18 खाती सील राज्य सरकारची कारवाई

मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. यामुळे राज्यातील अनेक महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या काही महिलांच्या खात्यात तिसरी रक्कमदेखील जमा झाली आहे. पण यादरम्यान, अनेक जिल्ह्यांमध्ये या योजनेत गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहे.
नुकतेच नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकाने घोटाळा केल्याची माहिती समोर आली. हे प्रकरण समोर येताच महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याची माहिती दिली. महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, नांदेडममध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितले की, संबंधितांची बँक खाती सील करणार असून त्यानुसार 18 खाती गोठवण्यात आली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार,नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सचिन मल्टीसर्विसेस नावाने सुरू असलेल्या केंद्रात हा घोटला झाल्याचे समोर आले. सचिन थोरात हा तरुण हे केंद्र चालवत असल्याचे समोर आले आहे. त्याने रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. त्यानंतर संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचे सांगत काढून घेतले. यावरून आता राज्य सरकारने कारवाई केली. तसेच, यापुढेही माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे.





