पुणे – पश्चिम महाराष्ट्राच्या गडावर मतदारांनी भाजप-महायुतीचा झेंडा रोवत जवळपास ५८ पैकी ४५ जागा दिल्या आहेत. हा आकडा आमचे आखलेले “मिशन’ पूर्ण करणारा आहे. पश्चिम महाराष्ट्रात मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला जाईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुतीच्या विजयानंतर मोहोळ बोलत होते. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला राज्यात, पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यात अभूतपूर्व यश मतदारांच्या साथीने मिळाले. या विश्वासाबद्दल मतदारांचे मनापासून आभार. मतदारांचा हा कौल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, केंद्र आणि राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर जनतेने मतांद्वारे व्यक्त केलेला विश्वास आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुशल आणि संवेदनशील नेतृत्वाचाही हा विजय आहे. विरोधकांच्या फेक अजेंड्याला फडणवीस यांनी दिलेले थेट उत्तर जनतेला अधिक आश्वासक वाटल्याने मतांचे भरघोस दान महायुतीच्या पदरात मतदारांनी टाकले. मतांच्या लाचारीपोटी व्होट जिहादच्या विरोधकांच्या कारस्थानाला जनतेने धर्मयुद्धाद्वारे उत्तर देऊन एक इशाराच दिला आहे,’ असेही मोहोळ म्हणाले. “पुणे शहरातील आठपैकी सात आणि जिल्ह्यातील तेरापैकी अकरा जागा महायुतीला देताना पुणेकरांनी महायुतीच्या विकासाच्या कामांवर मोहोर उमटवली आहे. महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मनःपूर्वक अभिनंदन.” – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री