Municipal Corporation Election | राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निकालानंतर आता महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यानुसार आजपासून (मंगळवार, २३ डिसेंबर) मुंबईसह २९ महापालिकेसाठी अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. मात्र अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत पेच कायम असल्याचे दिसत आहे. जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे दावे केले जात असले तरी, कोणत्याही महानगरपालिकेबाबत सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मुंबईत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी उद्धवसेना त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांसह इतर पालिकांमध्ये युती-आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबई महानगरसह राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रत लढतील असं चित्र आहे. पुण्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक सहा मनपा असून याठिकाणी भाजप आणि शिंदे सेनेत युतीवरून अजूनही स्पष्टता झालेली नाही. ठाकरे बंधूंची युतीची बोलणी अंतिम टप्प्यात असून याबाबत अद्याप कोणतीही झालेली नाही. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जागावाटपाची चर्चा सुरू आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम अर्ज भरण्यास प्रारंभ : २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ३० डिसेंबर अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत : २ जानेवारी २०२६ चिन्हवाटप व उमेदवारांची अंतिम यादी : ३ जानेवारी २०२६ मतदान : १५ जानेवारी २०२६ मतमोजणी : १६ जानेवारी २०२६ ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे उमेदवारी अर्ज व शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. परंतु, विविध राजकीय पक्षांची मागणी लक्षात घेऊन महापालिका निवडणुकीत पारंपरिकरीत्या ऑफलाइन पद्धतीनेच उमेदवारी दाखल करता येणार आहेत. हेही वाचा: रणधुमाळी सुरु! आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात; वाचा संपूर्ण वेळापत्रक