Pune : मिशन “सेतू केंद्र सक्षमीकरण’

पुणे : नागरिकांना विविध दाखले, सनद, निकाल, सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या आपले सरकार सेवा तसेच सेतू केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात या केंद्रांची तपासणी करून त्यांना येत असलेल्या अडचणी तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सेवांबाबत आढावा घेतला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनातर्फे २१ नोंदणीकृत सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. नागरिकांना त्यासाठी तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. मात्र, याचे विकेंद्रीकरण करून या सेवा व सुविधा आपले सरकार व सेतू केंद्रांमार्फत गावपातळीवर देण्यात येत असतात. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ८८८ सेवा केंद्रांना परवाने देण्यात आले आहेत. त्यातील १ हजार ३७३ केंद्र कार्यरत आहेत. तर सुमारे सव्वादोनशे केंद्र बंद आहेत. या केंद्रांमधून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा तसेच चालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा प्रशासनाच्या सर्व सेवा सुविधा गावपातळीवरच मिळाव्यात यासाठी या केंद्रांचे सक्षमीकरण करण्याचे ठरविले आहे. यासाठी त्यांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यात सरकारच्या धोरणानुसार कामकाज होत आहे का, हे तपासले जात आहे. नसल्यास त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून नागरिकांना सेवा तत्परतेने कशी मिळतील, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
सेवा पुरविण्याबाबत या केंद्रचालकांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. सध्या अनोंदणीकृत सेवा देण्याचे प्रमाण केवळ ६० टक्केच आहे. त्यातही वाढ करण्यासाठी या चालकांना सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.





