पुणे | मिशन ॲडमिशन; अकरावी प्रवेशासाठी १२ जुलैपर्यंत मुदत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे, पिंपरी- चिचवड महापालिका क्षेत्रांतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ९९ हजार १७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी (दि. १०) जाहीर करण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी ८९ हजार १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग -१ भरून ते लॉक केले आहेत. ४० हजार ८९० अर्जांची ऑनलाइन, तर ४७ हजार ७९२ अर्जांची मार्गदर्शन केंद्राकडून पडताळणी झाली आहे. ३४३ महाविद्यालयांत १ लाख १९ हजार ७०५ प्रवेशाच्या जागा उपलब्ध असून, त्यात कॅपअंतर्गत ९३ हजार ३४६ व कोटाअंतर्गत २६ हजार ३५९ जागांचा समावेश आहे.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीत कॅपअंतर्गत २० हजार ५६३ व कोटाअंतर्गत ४ हजार ८०९ यानुसार २५ हजार ३७२ विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात प्रवेश झाले आहेत. आता कॅपअंतर्गत ७२ हजार ७८३ व कोटाअंतर्गत २१ हजार ५५० एवढ्या जागा रिक्त आहेत.
दुसरी नियमित प्रवेश फेरी ३ जुलैपासून सुरू झाली आहे. डेटा प्रोसेसिंग झाल्यानंतर ९ जुलैला पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार आहे. १० जुलैला विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मिळालेल्या कनिष्ठ निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना १२ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे. पुढील फेरीची रिक्त यादीही याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.




