पुणे | बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र शासनाच्या जाहिरातीवर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर महायुती सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा योजना जाहीर करून मतदारांना आत्कृष्ट करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या जाहिरातीत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या वरुडे गावातून तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे छायाचित्र झळकल्याने खळबळ उडाली आहे. जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र वापरल्याने कुटुंबीयांकडून संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, समाजमाध्यमात प्रसारित झालेली जाहिरात अधिकृत नसल्याचा खुलासा महायुती सरकारने केला असून, संबंधित जाहिरात माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातून प्रसारित झाली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील वरूडे गावातील ज्ञानेश्वर विष्णू तांबे तीन वर्षांपूर्वी बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला, तरीही ठावठिकाणा लागला नाही. सरकारने नुकतीच तीर्थदर्शन योजना जाहीर केली असून, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
देशभरातील ६६ तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू आहे. त्यासाठी प्रवाशांना ३० हजारांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेच्या जाहिरातीवर ज्या व्यक्तीचे छायाचित्र वापरले, ती व्यक्ती अडीच ते तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
तीर्थदर्शनाला गेले अन् बेपत्ता झाले
जाहिरातीत बेपत्ता व्यक्तीचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर उशिरा शिक्रापूर पोलिसांचे पथक वरुडे गावात दाखल झाले. त्यांनी तांबे कुटुंबीयांची भेट घेतली, तेव्हा ज्ञानेश्वर तांबे गेल्या काही वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. डिसेंबर २०२१ मध्ये तीर्थक्षेत्र दर्शनासाठी गेल्यानंतर ते घरी परतले नव्हते.
त्यानंतर त्यांचे छायाचित्र जाहिरातीत दिसून आले. तांबे बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली नव्हती. जाहिरातीत तांबे यांचे छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांकडून तक्रार घेण्यात आली असून, कार्यवाही सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिली.





