Missing Child: काळजाचा ठोका चुकला! उसाच्या शेतातून रात्रभर येत होता रडण्याचा आवाज; पोलिसांनी टॉर्च लावली अन…
Missing Child: यवत पोलिसांची कौतुकास्पद तत्परता; वनविभाग आणि श्वानपथकाच्या मदतीने रात्रभर राबवले सर्च ऑपरेशन, खुटबाव येथील २१ महिन्यांचा आयुष सुखरूप मुक्त.

Missing Child – यवत पोलीस ठाण्याच्या तत्पर आणि प्रभावी शोध मोहिमेमुळे हरवलेल्या २१ महिन्यांच्या बालकाचा अवघ्या काही तासांत शोध लागल्याने कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. दौंड तालुक्यातील खुटबाव (थोरातवस्ती), येथील रहिवासी सोमनाथ माणिक बंडगर यांचा २१ महिन्यांचा मुलगा आयुष उर्फ भैख्या हा १५ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागील नाथ म्हस्कोबा मंदिरासमोर खेळत असताना बेपत्ता झाला होता.
अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून किंवा फूस लावून त्याला घेऊन गेल्याचा संशय व्यक्त करीत आयुषचे वडील सोमनाथ बंडगर यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
यवत पोलिसांची जलदगतीने नियोजनबद्ध शोधमोहीम आणि सतर्कतेमुळे चिमुकल्या आयुषचा शोध लागल्याने कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले. घटनेमुळे यवत पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, विजय कोल्हे, सागर माने, बाळकृष्ण गाडेकर, पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मोहिमेत मोलाची भूमिका बजावली.
उसाच्या शेतात आढळला
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी तातडीने विशेष शोध पथके तयार केली. वनविभागाची मदत घेऊन परिसरातील ऊस शेती, निर्जन भाग, रस्ते तसेच परिसरात व्यापक शोधमोहीम राबविली. श्वान पथकालाही पाचारण केले. रात्रभर सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर यश आले. (दि.१६) रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास आयुष हा घराजवळील उसाच्या शेतामध्ये सुखरूप अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले.





