Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनच्या राजधानीवर क्षेपणास्त्राचा हल्ला
रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये किमान एक जण ठार झाला आणि १६ जण जखमी झाले आहेत.

Russia Ukraine War – रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये किमान एक जण ठार झाला आणि १६ जण जखमी झाले आहेत. हवाई संरक्षण प्रणाली कार्यरत असतानाही हा हल्ला झाल्यामुळे युक्रेनकडे आता अमेरिकेच्या बनावटीची पेट्रिएट हवाई संरक्षण प्रणाली कमी पडत असल्याचे उघड झाले आहे.
रशियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच रोखण्याची क्षमता असलेल्या पेट्रिएट क्षेपणास्त्रांचे युक्रेनने उत्पादन करण्यासाठी परवाना देण्याची आपली तयारी असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
युक्रेनकडून या क्षेपणास्त्रांचे उत्पादन सुरू केले गेल्यावर रशियाच्या अशा हल्ल्यांपासून बचाव करण्याची क्षमता युक्रेनला मिळू शकेल. मात्र या निर्णयाच्या अंमलबजावणीचा तपशील आणि त्याबाबतची कालमर्यादा स्पष्ट होऊ शकलेली नाही.
युक्रेनवरचा रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला रात्री १.३० वाजल्याच्या सुमारास सुरू झाला. यातील बहुतेक क्षेपणास्त्रे राजधानी युक्रेनला लक्ष्य करण्यासाठी डागली गेली होती, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे युक्रेनच्या पाच जिल्ह्यांमध्ये आग लागली. काही रहिवासी इमारती, कार्यालये, वाहने आणि औद्योगिक ठिकाणांचे नुकसान झाले, असे युक्रेनच्या आपत्कालिन सेवेने म्हटले आहे.
स्वियातोशिस्की जिल्ह्यात आग लागलेल्या घरातून चौघांना बाहेर काढण्यात आले. शेवचेन्कीवास्की जिल्ह्यातही रहिवाशांना वाचवण्यात आले. तर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळला. सोलोमियान्स्की, डेस्नियान्स्की आणि ड्निप्रो जिल्ह्यांमध्ये आगी लागल्याचे अग्निशामक दलांनी सांगितले.





