मिरजगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हेंटिलेटरवर; शस्त्रक्रियेनंतर महिलांना जमिनीवर झोपवले

कर्जत – सर्वसामान्य नागरिकांना मोफत उत्तम रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारली गेली असली तरी, अपुऱ्या सोयीसुविधा आणि प्रचंड निष्क्रियतेमुळे माफक दराची सेवा मिरजगाव परिसरातील लोकांना महागात पडत आहे. येथे नुकत्याच झालेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलांना अक्षरशः जमिनीवर झोपविण्यात आले. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.
येथील आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर या महिलांना जमिनीवर झोपविण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना कोणत्याही प्रकारची सोय आरोग्य केंद्राकडून करण्यात आली नव्हती. महिलांना शस्त्रक्रियेच्या आधीच्या दिवशी तपासणीसाठी आरोग्य केंद्रात बोलविण्यात आले होते. त्यावेळी देखील या महिलांना एका खोलीत नेऊन जमिनीवर झोपवून इंजेक्शन देण्यात आले.
यावेळी महिलांना कित्येक तास ताटकळत उभे ठेवण्यात आले. त्यांच्या बसण्याची आणि इतर कोणतीही सोय करण्यात आली नव्हती.जीर्ण झालेली इमारत, खाटांचा तुटवडा, स्वच्छतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांची कमतरता. यामुळे गोरगरीब नागरिकांना इच्छा नसताना देखील खासगी दवाखान्यात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.त्यामुळे आजारी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रालाच आता उपचाराची गरज आहे, अशी खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची होणारी मानसिक आणि आर्थिक पिळवणूक आधुनिक आणि प्रगत महाराष्ट्राची भाषा करणाऱ्या राज्याला नक्कीच शोभणारी नाही.आरोग्यासारख्या महत्वाच्या गोष्टीकडे कोणाचेच लक्ष नसणे दुर्दैवी आहे. आरोग्य केंद्रात जर चांगले उपचार आणि सुविधा मिळाल्या तर सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला असता. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे पाठ फिरविली आहे.
मिरजगाव आरोग्य केंद्र हे मागील अनेक वर्षांपासून असुविधांचे आगार ठरत आहेत.गोरगरीब नागरिकांच्या आणि रुग्णांच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत. याबद्दल वरिष्ठांना देखील वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे. या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे, असे माजी सदस्य पंचायत समिती प्रशांत बुद्धिवंत म्हणाले.
आरोग्य केंद्रात आलेल्या महिलांसाठी कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधांचा उपलब्ध नाहीत. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जमिनीवर झोपावले गेले. कुटुंबियांसाठी देखील कसलीच सोय उपलब्ध नसल्याची तक्रार रुग्ण महिलेने केली.
इमारत जुनी असल्यामुळे भौतिक सुविधांची कमतरता आहे. महिला रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी 10 महिलांचा गट करून शस्त्रक्रिया करण्यात येतील. अधिक खाटांची नूतन इमारत प्रस्तावित असल्याचे प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष शिंदे म्हणाले.





