Miraj News : मिरजमध्ये स्वस्तात कार, दुचाकी व सोने देण्याचे आमिष दाखवून दोघांची फसवणूक
स्वस्त दरात चारचाकी, दुचाकी व सोने देण्याचे आमिष दाखवून मिरजेतील (Miraj News) दोघांची तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Miraj News : स्वस्त दरात चारचाकी, दुचाकी व सोने देण्याचे आमिष दाखवून मिरजेतील (Miraj News) दोघांची तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अबरार अल्ताफ शेख (रा. कोल्हापूर, सध्या सुदर्शन नगर, पुणे) व अकीब अल्ताफ शेख (रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) या भावांविरुद्ध मिरज शहर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूरच्या शेख बंधूंनी मिरजेतील (Miraj News) पंचशील चौक, वखारभाग येथे ‘मोटोक्यूब’’ नावाने कार्यालय सुरू केले होते. दोन महिने अगोदर रक्कम भरल्यास ६० टक्के किमतीत कार व दुचाकी देण्याची तसेच कमी किमतीत सोने देण्याची योजना त्यांनी मांडली होती. सुरुवातीला काही ग्राहकांना प्रत्यक्षात कार, दुचाकी व सोने देऊन शेख बंधूंनी अनेकांचा विश्वास संपादन केला होता.
जमीर सलीम मुजावर (रा. कैकाडी गल्ली, मिरज) व त्यांचे मित्र युसुफ इसाक सय्यद (रा. सांगली वेस, मिरज) यांनाही स्वस्त दरात कार, दुचाकी व सोने देण्याचे आश्वासन देण्यात आले. २१ डिसेंबर २०२३ ते १ जुलै २०२४ या कालावधीत वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात एकूण २५ लाख ८५ हजार रुपये उभयतांकडून घेण्यात आले.
यामध्ये जमीर मुजावर यांच्याकडून ८ लाख ४५ हजार रुपये, तर युसुफ सय्यद यांच्याकडून १७ लाख ४० हजार रुपये (Miraj News) घेण्यात आले. मात्र, निर्धारित वेळेत कोणतीही वाहने अथवा सोने न देता शेख बंधूंनी संपूर्ण रक्कम हडप करुन फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी जमीर सलीम मुजावर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अबरार शेख व अकीब शेख या भावांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबरार शेख याने मिरज-सांगली परिसरात अशाच प्रकारे अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. या फसवणुकीसाठी नेमण्यात आलेले काही एजंटही सध्या फरारी आहेत. या प्रकरणी आगामी काळात आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.






