Miraj News : मिरज पोलिसांची धडक कारवाई: विविध स्कॅममध्ये अडकलेले तब्बल १९ लाख रुपये तक्रारदारांना केले परत
ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांविरोधात मिरज शहर पोलिसांनी (Miraj News) प्रभावी कारवाई करत फसवणूक झालेली तब्बल १९ लाख रुपयांची रक्कम नागरिकांना परत मिळवून दिली आहे.

Miraj News : ऑनलाइन व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्यांविरोधात मिरज शहर पोलिसांनी (Miraj News) प्रभावी कारवाई करत फसवणूक झालेली तब्बल १९ लाख रुपयांची रक्कम नागरिकांना परत मिळवून दिली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये तातडीने हालचाल करत पोलिसांनी संबंधित बँक अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून फसवणुकीची रक्कम सुरक्षित केली.
मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना सायबर गुन्हेगारांकडून (Miraj News) विविध माध्यमांचा वापर करून आर्थिक गंडा घालण्यात आला होता. डिजिटल अरेस्ट, बँकेचे केवायसी अपडेट, ऑनलाइन शॉपिंग, मोबाईल हॅकिंग, बनावट मेसेज, लोन अॅप, फेक ॲमेझॉन अकाउंट, ट्रेडिंग स्कॅम, ऑनलाइन शेअर ट्रेडिंग अॅप, फेक वेबसाइट तसेच सोशल मीडिया अकाउंट हॅक अशा विविध प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती.
या फसवणुकीबाबत एनसीआरपी पोर्टलच्या माध्यमातून मिरज शहर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सायबर विभागाने तातडीने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. त्यानंतर संबंधित बँक अधिकारी तसेच नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फसवणूक झालेली रक्कम ज्या-ज्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली होती, त्या खात्यांवर तातडीने फ्रीजची कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली.
पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे फसवणूक झालेल्या तक्रारदारांच्या बँक खात्यावर एकूण १९ लाख रुपये सुरक्षितपणे परत करण्यात आले. कष्टाची कमाई परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी मिरज शहर पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत.
नागरिकांनी सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन
सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार लक्षात घेता मिरज (Miraj News) शहर पोलिसांनी नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून बँक खात्याची माहिती, ओटीपी अथवा पिन शेअर करू नये. ऑनलाइन शॉपिंग किंवा पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली पैशांची गुंतवणूक करण्याचे आमिष दाखविल्यास त्याला बळी पडू नये.
तसेच व्हॉट्सॲपवर येणाऱ्या अनोळखी एपीके फाईल्स तात्काळ ओपन करू नयेत. सायबर फसवणूक झाल्यास वेळ न दवडता तात्काळ राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कामगिरी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर , मिरज विभागाचे उपअधीक्षक अजय कोकाटे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील नायकोडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे.






