Crime News : सराईताच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका
Crime News : अल्पवयीन मुलगी ५ जून रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांकडे शोधाशोध करूनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.

लोणी काळभोर : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची अवघ्या दहा दिवसांत सुखरूप सुटका करण्यात लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तडीपार सराईत गुन्हेगाराला शेवाळवाडी येथील एका लॉजवरून अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शुभम संजय धुमाळ (वय २६, रा. धुमाळ मळा, म्हस्कोबा मंदिराजवळ, थेऊर फाटा, कुंजीरवाडी) असे आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अल्पवयीन मुलगी ५ जून रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांकडे शोधाशोध करूनही तिचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही शुभम धुमाळ याने तिला फूस लावून पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम धुमाळ हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर तडीपारीची कारवाईदेखील करण्यात आली होती.
मात्र, कायद्याचा धाक न बाळगता तो पुन्हा परिसरात सक्रिय झाल्याचे तपासात समोर आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. दरम्यान, पोलीस हवालदार अण्णा माने आणि सचिन सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुभम धुमाळ हा नाव बदलून शेवाळवाडी येथील एका लॉजमध्ये राहत असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी सोमवारी (दि. १५) मध्यरात्री संबंधित लॉजवर छापा टाकला. यावेळी शुभम धुमाळ आणि अल्पवयीन मुलगी एकत्र आढळून आले. पोलिसांनी तात्काळ धुमाळला ताब्यात घेत मुलीची सुखरूप सुटका केली. त्यानंतर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. मंगळवारी (दि. १६) आरोपीला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अन्य बाबींचीही चौकशी करण्यात येत आहे.





