Minor Assault Case : सोरतापवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नर्सरीमधील धक्कादायक प्रकार; दोघांना बेड्या
Minor Assault Case : पीडितेला मानसिक त्रास देत मुख्य आरोपी वारंवार करत होता पाठलाग; उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने केली अटक.
Updated On:

Minor Assault Case : सोरतापवाडी परिसरातील एका नर्सरीमध्ये काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून उरुळी कांचन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे (दोघे रा. कोरेगाव मूळ, शिवा फार्म, ता. हवेली, जि. पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४(१) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित अल्पवयीन मुलगी नर्सरीमध्ये काम करत होती. आरोपींनी तिला मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यापूर्वीही मुख्य आरोपी संबंधित मुलीचा वारंवार पाठलाग करत होता. तसेच “आय लव्ह यू” असे बोलून मानसिक त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
आरोपी आणि त्याच्या मित्राने संबंधित मुलीला बोलावून घेतल्यानंतर हा प्रकार घडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.




