मंत्री विखे, आ. शिंदे समर्थकांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी

नगर – गेल्या दोन महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नावे मंगळवारी रात्री उशीरा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत बावनकुळे यांनी जाहीर केली. शहर जिल्हाध्यक्षपदी ऍड. अभय आगरकर यांना पक्षाने चार वर्षानंतर पुन्हा संधी दिली आहे. तर नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी नगर तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग तर नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी बारा वर्षापूर्वी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले, त्यानंतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत जिल्हा परिषद अध्यक्ष झालेले व तीन वर्षापूर्वी स्वगृही परतलेले विठ्ठलराव लंघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी पालकमंत्री आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांची दक्षिण व उत्तर अशी जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली असून ऍड. आगरकर मात्र स्वतंत्र असल्याचे बोलले जात आहे.सध्या तरी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंतांना संधी दिल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांची नावे या पदांसाठी चर्चेत होती. ती नावे अचानक गायब का झाली आहे. याबाबत कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या मे महिन्यात पक्षाचे निरीक्षक व प्रवक्ते माधव भंडारी यांनी तिन्ही जिल्हाध्यक्षांसाठी इच्छूक असणाऱ्या व त्यांच्या समर्थकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यानंतर लगेच या नियुक्त्या जाहीर होतील. असे वाटले होते. यावेळी नगर शहरातून 10, नगर दक्षिणेतून 5 व नगर उत्तरेतून 3 जण जिल्हाध्यक्ष पदांसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात आले होते.
नगर शहरातून विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, विद्यमान उपाध्यक्ष सचिन पारखी, वसंत लोढा, बाबासाहेब सानप, सीए राजेंद्र काळे, नितीन शेलार, वसंत राठोड व सुवेंद्र गांधी हे इच्छुक होते. दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदासाठी ऍड. युवराज पोटे, कर्जतचे शांतीलाल कोपनर, पाथर्डीचे राहुल कारखिले, जामखेडचे डॉ. ज्ञानेश्वर झेंडे व विद्यमान जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे हे तर उत्तरेसाठी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी येथील शिवाजी गोंदकर व श्रीरामपूरचे प्रकाश चित्ते यांची नावे होती.त्यापैकी नगर शहरासाठी सचिन पारखी, दक्षिणसाठी ऍड. युवराज पोटे तर उत्तरेसाठी बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव निश्चित मानले जात होते.
मात्र कनार्टकच्या निकालानंतर पक्ष संघटनेतील बदल मोठ्या प्रमाणात करण्याचे धोरण घेण्यात आले होते. त्याबरोबर आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्हाध्यक्षांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी ऍड. आगरकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ते यापूर्वी जिल्हाध्यक्ष राहिले असून त्यांच्या नेतृृत्वाखाली मागील महापालिकेची निवडणूक लढण्यात आली आहे. तसेच त्यांनी पक्षातर्फे विधानसभा निवडणुकी देखील लढली. दिलीप भालसिंग हे पालकमंत्री विखे व आ. शिंदे या दोन्ही नेत्यांचे समर्थक असल्याने तसेच त्यांनी नगर तालुकाध्यक्ष म्हणून यापूर्वी काम पाहिल्याने त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. भालसिंग यांनी जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिले असून ते जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक आहेत. नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी विठ्ठलराव लंघे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. लंघे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.




