निधी मिळूनही महापालिकेची झोळी फाटकीच

नगर– निधी उपलब्ध होऊनही महापालिकेची झोळी फाटकीच असल्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आहे. नगर महापालिकेच्या स्व.प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्राला आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने 55 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून केंद्राचे नूतनीकरण, फर्निचर यासह केंद्राचे डिजिटलायाझेशन केले जाणार आहे. मात्र, निधी उपलब्ध होऊन साडेचार महिने झाली तरी महापालिकेला अद्यापही काम सुरू करता आले नाही. अजूनही बांधकाम विभाग या कामाच्या खर्चाचे अंदाजपत्रकच तयार करीत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया तर खूप लांब राहिली आहे. हे साडेचार महिन्यांपासून या केंद्राच्या नूतणीकरणाचे काम रखडले आहे.
नगर शहर व जिल्ह्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी सन 2007 मध्ये प्रोफेसर कॉलनी चौकातील महापालिकेच्या सावेडी क्रीडा संकुलात या केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या कार्यकाळात तत्कालीन नगरसेवक सचिन पारखी व विनीत पाऊलबुद्धे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून स्पर्धा परीक्षा केंद्राच्या नवीन इमारतीसाठी सुमारे सव्वाकोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यातून टीव्ही सेंटर शेजारील महापालिकेच्या जागेत या केंद्रासाठी प्रशस्त इमारत उभारण्यात आली. सन 2016 मध्ये या नवीन वास्तूमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झाले. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सन 2019 मध्येच महापालिकेचा हा आदर्श उपक्रम बंद पडला. त्यानंतर सर्वांचेच याकडे दुर्लक्ष झाले. आता आमदार तांबे यांनी हे केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी तेथील आवश्यक फर्निचर, डिजिटलायाझेशन व इतर सुविधांसाठी शासनाकडून 55 लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे.
त्यामुळे लवकरच हे केंद्र पुन्हा सुरू होऊन गरजू विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र महापालिकेत कामे करण्याची इच्छा शक्तीच नसल्याने साडेचार महिन्यांपासून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. अतिशय कासवाच्या गतीने काम सुरू आहे.
स्पर्धा परीक्षा केंद्राच्या नूतनीकरण, फर्निचर व इतर कामांसाठी शासनाकडून 55 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून प्रस्तावित कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात येत आहेत. येत्या आठवड्याभरात हे तयार होईल. त्यानंतर निविदा प्रसिद्ध करून लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल व काम सुरू करण्यात येईल.




