सातारा – भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे अगदी सर्वच पक्षातील नेत्यांशी आपुलकीचे संबंध आहे. उदयनराजेंचा हटके अंदाज सर्वांनाच ठावूक आहे. तर त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही सर्वश्रूत आहेत. पूर्वी राष्ट्रवादीत असलेले आणि आता भाजपवासी झालेले उदयनराजे सध्या सातारच्या विकासासाठी आणि मराठा आरक्षणासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. त्यातच उदयनराजे यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र उदयनराजे मैत्रीत दिलदारही आहेत, असं नेहमीच सांगितलं जातं. असाच काहीसा किस्सा घडला आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते. त्याच वेळी उदयनराजे भोसले देखील गोव्याच्या दिशेने निघाले होते. महामार्गावर शंभुराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची गाडी थांबवली. उदयनराजेंना पाहून शंभुराज देसाईंनी त्यांची गाडी थांबवली. दोघांची भेट झाली. या भेटीत शंभुराज देसाई यांनी थेट उदयनराजेंना मुजरा केला. हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. आता हाच फोटो व्हायरल होत आहे.
शंभुराज देसाई उदयनराजे यांच्या मान कायम राहावा यासाठी प्रयत्नशील असतात. उदयनराजे यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर ते खपवून घेणार नाही, साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे, सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असंही काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई म्हणाले होते.