Nagar : राहुरीत 6.5 अंश सेल्सिअस नीचांकी तापमान

राहुरी : तीन दशकातील रात्रीच्या नीचांकी तापमानाची दि. 18 डिसेंबर रोजी नोंद झाली. रात्रीचे किमान तापमान 6.5 अंश सेल्सिअस होते. 1999 च्या नऊ जानेवारीला 3.1 इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर तापमानाच्या नीचांकी पाऱ्याची काल राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रात नोंद झाला. तीस वर्षांतील दुसरे नीचांकी किमान तापमान १८ डिसेंबरला नोंदले गेले. काश्मीरसारखी हुडहुडी भरणाऱ्या थंडीने सर्वांनाच बदललेल्या हवामानाचा अनुभव येत आहे.
अरबी समुद्रात जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्यामुळे उत्तरेकडील थंड हवा दक्षिणेकडे वाहत होती. त्यामुळे तापमानाचा रात्रीचा पारा एकदम कमी झाला असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठातील भारतीय हवामानशास्त्र विभागाचे डॉ. रवी आंधळे यांनी सांगितले.अजून दोन ते तीन दिवस थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मध्य महाराष्ट्रात हा प्रभाव अधिक होता. तुलनेत दक्षिण महाराष्ट्रात थंडीचा तडाखा तुलनेत कमी होता.
गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी उपयुक्त असली तरी द्राक्ष व अन्य फळ पिकांसाठी ही थंडी प्रतिकूल ठरणार आहे. थंडीने जनजीवन एकदम गारठून गेले आहे. थंडीचा जनजीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्दी , खोकला अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच उबदार कपडे ,रग, स्वेटर,कानटोप्या यांची देखील मागणी वाढली आहे.मात्र या सर्वांचा उपयोग करूनही हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. रात्री शेकोट्यांचाही आधार घेतला जात आहे.
११ ते १८ डिसेंबर रोजी किमान तापमानाची नोंद : 7.3 ,9.5 ,9.7 ,10.1 ,9.5 ,8.5, 7.5 आणि 6.5 असे किमान तापमान दि. 11 ते 18 फेब्रुवारी या दरम्यान राहुरीत नोंदवले गेले. कमाल तापमानात मात्र विशेष वाढ व घट झालेली नाही. ते 27 ते 28°c दरम्यान होते.





