आम्हाला पण इंडिया आघाडीत घ्या; इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला दिली थेट ऑफर

छत्रपती संभाजीनगर : एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठे विधान केले आहे. त्यांनी महाविकास आघाडीला थेट ऑफर दिली आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
काय म्हणाले इम्तियाज जलील?
इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला ऑफर देताना थेट जागा किती देणार हे स्पष्ट सांगा असं म्हटलंय. इम्तियाज जलील यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावलंसुद्धा. आम्हाला सोबत घेतले तर तुम्हाला फायदा. नाही घेतले तर एमआयएममुळे फटका बसला असा आरोप करू नका. महाविकास आघाडीत एमआयएमला किती जागा देणार स्पष्ट सांगा. आमची इच्छा आहेच इंडिया आघाडी सोबत जाण्याची असे इम्तियाज जलील म्हणाले.
नितेश राणेंवर केली टीका
इम्तियाज जलील यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंवर जोरदार टीका केली. नितेश राणे हा शेंबडा पोरगा, त्याला महत्त्व देऊ नका. चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला मारलं असतं. नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो. पोलिसांनी त्याला थोबाडीत मारली पाहिजे होती अशा शब्दात नितेश राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.





