हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; 4.5 रिश्टर स्केलवर नोंद

शिवशंकर निरगुडे
हिंगोली – हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. या भूकंपाची 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानक कंपन होऊन घरातील भांड्यांची पडझड होऊ लागल्याने नागरिक चांगलेच धास्तावले. गाढ झोपेत असलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली.
निमटोक येथील घराला तडा
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील निमटोक या गावातील विधवा महिला विमलबाई श्रीरंग कपाटे यांच्या घराला काही ठिकाणी तडे गेली आहेत. तर पेठवडगाव येथील बुरुजाचा वरील काही भाग पडला आहे.





