कोयना परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के ! 3.4 रिश्टर स्केल तीव्रता, नागरिकांत भीतीचे वातावरण
Updated On:

मुंबई – बुधवारी सकाळी 6.45 वाजता महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता.
कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले. भुकंपाचे धक्के सौम्य असल्याने कुठलेही नुकसान झाले नाही मात्र परिसरात भितीचे वातावरण पसरले होते.
या दरम्यान सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. येथे पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे.
सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये या भूकंपामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.



