Pimpri Chinchwad News : भारत-पाकिस्तान यांच्यांतील युद्धाचा तणाव वाढत असतानाच पिंंपरी चिंचवडमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे. पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगाराच्या दुकानात शुक्रवारी दि. ९ मे रोजी बॅाम्ब शेल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेनंतर येथील परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅाम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण करत घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना या ठिकाणी तपास केला असता दोन बॅाम्ब शेल मिळून आले. पोलिसांनी दोन्ही बॅाम्ब शेल ताब्यात घेतले आहेत. हे बॅाम्ब शेल जुने असून त्याची तीव्रता कमी झाल्याचा अंदाज आहे. खबरदारी म्हणून ते संरक्षण दलाच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगाराच्या दुकानात दि. ९ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही दोन बॅाम्ब शेल आढळून आली. याबाबत स्थानिकांना पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि बॅाम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने तपासणी केली असता दोन बॅाम्ब शेल मिळून आले. हे बॉम्ब शेल जुने असून त्यांची तीव्रता कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी सांगितले. यानंतर येथील परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बॅाम्ब शेल कुठून आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच कोणत्याही संसयास्पद वस्तू आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.