Migraine: मायग्रेन वाढवणाऱ्या चुका टाळा! तज्ञ सांगतात ‘हे’ सोपे उपाय
Migraine तज्ञांच्या मते, मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल, विशेषतः सेरोटोनिनची पातळी कमी होणे, यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. याशिवाय ताण-तणाव, अपुरी झोप, हार्मोनल बदल, तीव्र प्रकाश, मोठा आवाज आणि काही विशिष्ट पदार्थ जसे चॉकलेट किंवा कॅफीनयुक्त पेय यामुळेही मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो.

Migraine: मायग्रेन म्हणजे डोक्याच्या एका बाजूला होणारा तीव्र आणि टोचल्यासारखा त्रासदायक डोकेदुखीचा प्रकार. हा त्रास काही तासांपासून ते अनेक दिवसांपर्यंतही टिकू शकतो. मायग्रेन ही फक्त साधी डोकेदुखी नसून ती एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे. यामध्ये डोकेदुखीसोबत मळमळ, उलटी, तीव्र प्रकाश आणि आवाज सहन न होणं, डोळ्यांसमोर चमक दिसणं किंवा धूसर दिसणं अशी लक्षणं दिसतात.
तज्ञांच्या मते, मेंदूमध्ये होणारे रासायनिक बदल, विशेषतः सेरोटोनिनची पातळी कमी होणे, यामुळे मायग्रेनचा त्रास वाढतो. याशिवाय ताण-तणाव, अपुरी झोप, हार्मोनल बदल, तीव्र प्रकाश, मोठा आवाज आणि काही विशिष्ट पदार्थ जसे चॉकलेट किंवा कॅफीनयुक्त पेय यामुळेही मायग्रेन ट्रिगर होऊ शकतो. विशेषतः महिलांमध्ये पीरियड्स किंवा गर्भधारणेदरम्यान हा त्रास जास्त दिसतो.
मायग्रेन असलेल्या लोकांनी काही सामान्य चुका टाळणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अपुरी झोप घेणं. तज्ञ सांगतात की दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण न झाल्यास मेंदूला आराम मिळत नाही आणि त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. आजकाल मोबाईल आणि स्क्रीनचा जास्त वापरही झोपेवर परिणाम करतो, त्यामुळे झोपेची वेळ पाळणं गरजेचं आहे.

migraine
दुसरी मोठी चूक म्हणजे मोठ्या आवाजात राहणं. मायग्रेन असलेल्या व्यक्तींना मोठा आवाज सहन होत नाही. मोठ्या आवाजामुळे डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे अशा लोकांनी शांत ठिकाणी वेळ घालवणं आणि आवाजापासून दूर राहणं आवश्यक आहे.
तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे दीर्घकाळ उपाशी राहणं. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी किंवा व्यस्त दिनचर्येमुळे वेळेवर जेवत नाहीत. पण यामुळे शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होते आणि मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे वेळेवर आणि संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे.
तसेच, जास्त प्रमाणात कॅफीन घेणं टाळावं. कॉफी, चहा किंवा एनर्जी ड्रिंक्स यांचा अतिरेक झोपेच्या पॅटर्नवर परिणाम करतो आणि मायग्रेन वाढवू शकतो.
एकंदरीत, मायग्रेन नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार, ताण कमी ठेवणं आणि शांत वातावरणात वेळ घालवणं यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होऊ शकतो. योग्य काळजी घेतल्यास या समस्येवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.





