MI vs SRH : ‘जर फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर…’, पराभवानंतर पॅट कमिन्सचं मोठं वक्तव्य

MI vs SRH Pat Cummins reaction on the defeat : १७ एप्रिल रोजी आयपीएल २०२५ चा ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने ११ चेंडू शिल्लक असताना हैदराबादचा ४ विकेट्सनी पराभव केला. या पराभवामुळे हैदराबादचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण झाला आहे. संघाला आतापर्यंत सात पैकी फक्त २ सामने जिंकता आले आहेत. या पराभवानंतर एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सचे एक मोठे विधान समोर आले आहे.
हैदराबादच्या पराभवानंतर पॅट कमिन्स काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सकडून झालेल्या दारुण पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स खूप निराश दिसत होता. सामन्यातील दारुण पराभवाबद्दल बोलताना कमिन्सने पुनरागमन करण्याची आशा व्यक्त केली. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “जर कोणत्याही संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल, तर घराबाहेर सातत्याने चांगले खेळणे महत्त्वाचे आहे. दुर्दैवाने या हंगामात आतापर्यंत असे घडलेले नाही. आता पुढील सामन्यापूर्वी आमच्याकडे एक छोटासा ब्रेक आहे. त्यानंतर आम्ही पुन्हा सुरुवात करू.”
💙 & 🧡 blend in spirit 🫂#TATAIPL | #MIvSRH | @mipaltan | @SunRisers pic.twitter.com/zEcAkElFI9
— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2025
फलंदाजीसाठी ही खेळपट्टी कठीण होती – पॅट कमिन्स
मुंबईविरुद्धच्या पराभवाबद्दल बोलताना तो म्हणाला, “ही खेळपट्टी सोपी नव्हती. आमच्याकडे धावांची कमतरता होती. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी कठीण होती. पण त्यांनी चांगली गोलंदाजी केली असे नाही. त्यांनी आमच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची स्वातंत्र्य दिले नाही. मला वाटले की आमची तयारी पूर्ण झाली आहे. पण १६० धावांच्या धावसंख्येसह आम्ही थोडे कमी पडलो. तथापि, आम्ही गोलंदाजी करताना चांगले प्रयत्न केले.”
हेही वाचा – Dewald Brevis : IPL 2025 च्या मध्यात CSK चा मास्टर स्ट्रोक! मुंबईच्या माजी खेळाडूला संघात केले सामील
सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादने निर्धारित षटकांत ५ गडी गमावून १६२ धावा केल्या होत्या. यादरम्यान अभिषेक शर्माने ४० धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल, मुंबई इंडियन्सने १८.१ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. यासह यंदाच्या हंगामातील आपला तिसरा विजय नोंदवला. त्याचबरोबर हैदराबाद संघाला पाचव्या पराभवाला सामोर जावे लागले. ज्यामुळे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला आहे.





