MI vs KKR : केकेआर म्हणजे रोहितसाठी ‘बादाम हलवा’! माजी क्रिकेटपटूने KKR ला दिला इशारा; वानखेडेवर काय घडणार?
MI vs KKR : भारताचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमचारी श्रीकांत यांनी 'हिटमॅन' रोहित शर्माच्या फॉर्मबाबत कोलकात्याला दिलेला इशारा चर्चेत आहेत.

MI vs KKR Kris Srikkanth warns KKR about Rohit Sharma : आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणाऱ्या लढतीपूर्वीच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. भारताचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमचारी श्रीकांत यांनी ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या फॉर्मबाबत कोलकात्याला दिलेला इशारा सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
श्रीकांत यांनी केकेआरला दिला इशारा –
आयपीएलच्या १९ व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात रविवारी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने-सामने येणार आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी कृष्णमचारी श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनेलवर रोहित शर्माच्या आक्रमकतेबद्दल मोठे विधान केले आहे. श्रीकांत यांच्या मते, कोलकाता नाईट रायडर्स हा संघ रोहित शर्मासाठी ‘बादाम हलवा’ टीमसारखा आहे, ज्यांच्याविरुद्ध तो नेहमीच आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असतो.
केकेआर दिसली की रोहितचा गिअर बदलतो!
श्रीकांत म्हणाले की, “काही वर्षांपूर्वीपर्यंत रोहित शर्मासाठी केकेआर म्हणजे ‘हलवा’ होती. यंदाही तो त्यांच्या गोलंदाजीचा हलवा करून खाईल. रोहितला जसा केकेआरचा संघ समोर दिसतो, तसा तो अधिक घातक होतो. तो या संघाविरुद्ध खेळताना पूर्णपणे आत्मविश्वासात असतो.” मुंबई इंडियन्सला गेल्या १४ वर्षांपासून हंगामातील पहिला सामना जिंकता आलेला नाही, हा नकोसा विक्रम मोडण्यासाठी रोहितची बॅट चालणे अत्यंत आवश्यक आहे.
केकेआरविरुद्ध १००० पेक्षा जास्त धावा!
रोहित शर्मा हा आयपीएलमधील अशा मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्याने एका विशिष्ट संघाविरुद्ध १००० पेक्षा जास्त धावा कुटल्या आहेत. आकडेवारी पाहिली तर श्रीकांत यांचे विधान सार्थ वाटते. रोहितने केकेआरविरुद्ध आतापर्यंत ३५ सामने खेळले असून ३६.६८ च्या सरासरीने १०८३ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, केकेआरविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट १२७.८६ राहिला असून तो या संघासाठी नेहमीच मोठी डोकेदुखी ठरला आहे.
आता वानखेडेच्या घरच्या मैदानावर रोहित श्रीकांत यांनी वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरवतो की केकेआरचे गोलंदाज ‘हिटमॅन’ला रोखण्यात यशस्वी होतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





