MI Vs CSK : मुंबईला चेन्नईविरूद्ध हॅटट्रिकची संधी; कसा आहे दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड?

मुंबई : सुरुवातीच्या निराशेनंतर मुंबईने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादला हरवून चांगले पुनरागमन केले असले तरीही हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. चेन्नई विरूद्धची लढत जिंकून चालू हंगामात विजयाची हॅटट्रिक नोंदविण्याची चांगली संधी मुंबई संघाकडे रविवारी असणार आहे.
मागील सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांच्या शानदार गोलंदाजीने सनरायझर्स हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. त्यानंतर संघाने सहा विकेट्स गमावून विजयासाठी १६३ धावांचे लक्ष्य सहज गाठले. रविवारच्या सामन्यात खेळपट्टीने फिरकीपटूंना खूप मदत केली. पण चेन्नईविरुद्ध फिरकीपटूंना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर खेळणे संघासाठी धोकादायक ठरू शकते. फॉर्ममध्ये असलेल्या डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद व्यतिरिक्त, चेन्नईकडे अनुभवी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांचा पर्याय आहे. नूरने सात सामन्यांमध्ये एकूण १२ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील तीन विकेट्सचा समावेश आहे.
दोन्ही संघांमध्ये सध्याच्या घडीला मुंबईचा संघ जास्त उजवा आहे. रोहितने मोठी खेळी केली नसली तरी त्याने मुंबईला चांगली सुरूवात करून दिली आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत सातत्य राखले नसले तरी रायन रिकेल्टनने वरच्या फळीत चांगले योगदान दिले आहे. सनरायझर्सच्या विजयात विल जॅक्सच्या अष्टपैलू कामगिरीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अनुभवी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक मजबूत झाली असून ट्रेंट बोल्ट देखील त्याच्या जुन्या शैलीत दिसत आहे.
कर्ण शर्माची दुखापत डोकेदुखी असली तरी चेन्नईने मागील सामन्यात लखनौ सुपरजायंट्सवर पाच विकेट्सने विजय मिळवून पाच सामन्यांच्या पराभवाची मालिका थांबवली, परंतु त्यांची फलंदाजी अजूनही त्यांची कमकुवत बाजू आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे बाहेर पडल्याने, महेंद्रसिंग धोनी कर्णधार म्हणून परतला आहे. त्याच्या वानखेडे स्टेडियमशी अनेक खास आठवणी जोडल्या गेल्या आहेत. यामध्ये २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात विजयी षटकार मारणे आणि आयपीएलच्या गेल्या हंगामात चार चेंडूत २० धावांच्या नाबाद खेळीदरम्यान हार्दिकविरुद्ध तीन षटकार मारणे यांचा समावेश आहे.
कसा आहे दोन्ही संघाचा हेड टू हेड रेकॉर्ड?
मुंबईने ३८ पैकी २० सामने जिंकले आहेत तर चेन्नईने १८ वेळा विजय मिळवला आहे. मागच्या ५ सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईने फक्त १ सामना जिंकला आहे तर ४ सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभव स्वीकारावा लागला होता.





