महू हिंसाचार प्रकरणात ४ एफआयआर दाखल, झाला मोठा खुलासा ; वाचा आता परिस्थिती कशी ?

Mhow Violence । मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू याठिकणी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाच्या जल्लोषात दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची घटना घडली. या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली, तर तर, मोती महल टॉकीजजवळ झालेल्या गोंधळानंतर, महू पोलिस ठाण्यात १७ जणांविरुद्ध आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु सकाळी परिस्थिती सामान्य आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, इंदूरच्या वेगवेगळ्या भागात हिंसाचाराच्या पाच घटना घडल्या आणि तीन कारसह अनेक दुचाकींची तोडफोड करण्यात आली आणि त्यांना आग लावण्यात आली. इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, “महू शहरात जाळपोळ आणि हिंसाचारात सहभागी असल्याबद्दल पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अशांत भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले,” असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सुरुवातीच्या अहवालांनुसार, मिरवणूक वेगवेगळ्या भागातून काढण्यात आली होती आणि नंतर एका गटाचा दुसऱ्या गटाशी फटाके फोडण्यावरून वाद झाला.” जिल्हाधिकाऱ्यांच्या मते, चौकशीनंतर यासाठी कोण जबाबदार आहे हे स्पष्ट होईल.
डझनभर दुचाकी जाळण्यात आल्या Mhow Violence ।
दरम्यान, महू पोलिस ठाण्याचे प्रभारी राहुल शर्मा म्हणाले की, तीन कार आणि एक डझन दुचाकींवर हल्ला करण्यात आला आणि त्यांना आग लावण्यात आली. त्यांनी सांगितले की, पोलीस ताल मोहल्ला, सेवा मार्ग, पट्टी बाजार, मानेक चौक आणि जामा मशीद परिसरात घडलेल्या पाचही घटनांचा तपास करत आहेत.
व्हिडिओची चौकशी सुरू Mhow Violence ।
त्यांच्या मते, जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीत सहभागी असलेल्या व्यक्तींची ओळख पटविण्यासाठी लोकांनी मोबाईल फोनवर काढलेले सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ तपासले जात आहेत. त्याच वेळी, मास्क घालून दगडफेक करणाऱ्या आणि पेट्रोल बॉम्ब फेकणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांनी सांगितले की, रविवारी रात्री उशिरा सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा महू येथे पोहोचला. इंदूर जिल्हा मुख्यालयापासून २५ किमी अंतरावर असलेल्या महू येथे वरिष्ठ पोलिस अधिकारीही पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात एकूण ४ एफआयआर नोंदवले आहेत. ४ एफआयआरमध्ये सुमारे ४० जणांवर आरोप करण्यात आले आहेत. तेथे 12 बाइक, 2 ऑटो आणि 1 कार जाळल्या गेल्या. दोन दुकानांनाही आग लावण्यात आली.
गोंधळ का झाला?
इंदूर ग्रामीण एसपी हितिका वसल म्हणाल्या की, भारतीय संघाने विजेतेपद जिंकताच, महूमध्ये १०० हून अधिक लोकांनी ५० मोटारसायकलींवर मिरवणूक काढली. या दरम्यान, मिरवणूक जामा मशिदीजवळून जात असताना, काही लोकांनी मशिदीबाहेर फटाके फोडले. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली.





