मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्य आणि दक्षिणेकडील भागांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला आहे. या पावसामुळे दरडी कोसळण्याच्या काही घटनादेखील घडल्या आहेत. अतिवृष्टीशी संबंधित विविध घटनांमध्ये किमान २८ जण मरण पावले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे रुप प्राप्त झाले असून त्या पुराच्या पाण्यामध्ये रस्त्यावरील वाहने वाहून जात असल्याची दृश्ये सोशल मीडियावर पोस्ट झालेल्या व्हिडीओंमध्ये दिसते आहे. मेक्सिकोतील सरकारने लोकांच्या मदतीसाठी ८,७०० लष्करी कर्मचारी तैनात केले आहेत. मध्यवर्ती राज्य हिडाल्गो येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तिथे १६ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, असे राज्याचे गृह मंत्री गिलेर्मो ऑलिव्हरेस रेयना यांनी म्हटले आहे. भूस्खलन आणि नद्याना पूर आल्याने पुराचे पाणी काठावरुन वाहू लागले आहे. त्यामुळे राज्यात किमान १,००० घरे, ५९ रुग्णालये आणि दवाखाने आणि ३०८ शाळांचे नुकसान झाले आहे. राज्यातील ८४ पैकी १७ नगरपालिकांमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे, असे ते म्हणाले. शेजारच्या पुएब्ला राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि १३ जण बेपत्ता झाले आहेत. प्रांतात आलेल्या पूरस्थितीमुळे काही लोक घराच्या छपरांवर अडकून पडले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी राष्ट्रीय सरकारने मदत करावी, असे आवाहन गव्हर्नर अलेजांद्रो आर्मेन्टा यांनी केले आहे. मुसळधार पावसामुळे सुमारे ८०,००० लोक प्रभावित झाले आहेत. भूस्खलनामुळे गॅस पाईपलाईन तुटल्या असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.