मेक्सिको, कॅनडा, व्हिएतनामची अमेरिकेला निर्यात वाढली; भारत सहाव्या क्रमांकावर

नवी दिल्ली – अमेरिका आणि चीनदरम्यान 2018 पासून कमी अधिक प्रमाणात व्यापार युद्ध चालू आहे. यामुळे भारताला अधिक लाभ होईल आणि भारताची अमेरिकेला निर्यात वाढेल असे समजले जात होते. मात्र प्रत्यक्षात इतर पाच देशाची अमेरिकेला भारतापेक्षा जास्त निर्यात झाली आहे. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा घेण्यात भारताला अपयश आले असल्याचे समजले जाते.
भारत आणि अमेरिकेने राजनैतिक संबंध चांगले ठेवण्याबरोबरच भारतीय उद्योगांनी कार्यक्षमता वाढविण्याची आणि वस्तूच्या किमती कमी करण्याची गरज आहे. तरच अमेरिकेला निर्यात वाढू शकेल, असे या संदर्भात जीटीआरआय या संस्थेने संकलित केलेल्या माहितीत म्हटले आहे.
2018 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प होते. त्यांनी चीन विरोधात मोहीम राबविली होती. आता पुन्हा ट्रम्प यांची अमेरिकेच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहते. त्यांनी मेक्सिको, कॅनडा आणि चीन विरोधात व्यापारी युद्ध सुरू करण्याची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत भारताला पुन्हा एक संधी मिळू शकते. मात्र भारताने राजनैतिक आणि औद्योगिक पातळीवर योग्य भूमिका घेतली तर भारताला या संधीचा लाभ मिळू शकतो असे वातावरण आहे.
जीटीआरआय या संस्थेचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितले की, अमेरिका- चीन व्यापार युद्ध सुरू झाल्यापासून मेक्सिकोची अमेरिकेला वाढलेली निर्यात 164 अब्ज डॉलर आहे. या कालावधीत कॅनडाची अमेरिकेला वाढलेली निर्यात 124 अब्ज डॉलर आहे. विशेष म्हणजे दक्षिण आशियातील व्हिएतनाम या देशाची अमेरिकेला वाढलेली निर्यात तब्बल 70 अब्ज डॉलर आहे. दक्षिण कोरिया भारताच्या पुढे असून दक्षिण कोरियाची या कालावधीत अमेरिकेला वाढलेली निर्यात 46 अब्ज डॉलर आहे. जर्मनीची अमेरिकेला या काळात वाढलेली निर्यात 43 अब्ज डॉलर आहे.
भारत सहाव्या क्रमांकावर
या क्रमवारीत भारत सहाव्या क्रमांकावर असून या कालावधीत भारताची अमेरिकेला वाढलेली निर्यात 36 अब्ज डॉलर असल्याचे या संस्थेने म्हटले आहे. या कालावधीत भारतातून वाढलेली निर्यात इलेक्ट्रॉनिक्स, औषधी आणि इंजिनिअरिंग वस्तूची असल्याचे सांगण्यात आले. भारतातून स्मार्टफोन आणि दूरसंचार क्षेत्रातील उपकरणाची अमेरिकेला निर्यातही या कालावधीत वाढली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेतील अॅपल कंपनी भारतात उत्पादन करून त्याची निर्यात अमेरिकेला करते.





