NCP : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला दोन शहराध्यक्ष
NCP :

पश्चिमची धुरा विशाल तांबे, पूर्व विभागाची श्रीकांत पाटील यांच्याकडे
NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुणे शहरातील संघटनात्मक बांधणीला नवे वळण देत शहराध्यक्ष पदाचीच विभागणी केली आहे. पुणे पश्चिम आणि पुणे पूर्व अशा दोन विभागांची निर्मिती करून पश्चिमची धुरा विशाल तांबे, तर पूर्वची जबाबदारी श्रीकांत पाटील यांच्याकडे सोपवली आहे.
आगामी राजकीय आव्हाने आणि संघटन विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पक्षाने पुण्यात दोन शहराध्यक्ष अशी नवी रचना केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
यापूर्वी शिवसेनेने शहरात दोन शहरप्रमुख नेमले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही महिन्यांपूर्वी दोन शहराध्यक्ष नेमल्यानंतर काँग्रेसकडून हा प्रयोग राबविण्यात आला. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही त्याच पद्धतीने दोन शहराध्यक्ष नेमले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी १७ ऑगस्ट रोजी दोन्ही नियुक्त्यांची स्वतंत्र पत्रे जारी केली. पक्षासाठी दिलेले योगदान आणि संघटनात्मक कामाचा अनुभव लक्षात घेऊन तांबे आणि पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविल्याचे नियुक्तीपत्रात नमूद केले आहे.
आठ विधानसभा मतदारसंघांची विभागणी NCP :
विशाल तांबे यांना पुणे पश्चिम शहराध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात खडकवासला, हडपसर, पर्वती आणि कसबा हे चार विधानसभा मतदारसंघ असतील. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह मोठ्या लोकसंख्येच्या मतदारसंघांमध्ये पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे आव्हान तांबे यांच्यासमोर राहणार आहे.
श्रीकांत पाटील यांच्याकडे पुणे पूर्व शहराध्यक्षपद सोपविले असून, शिवाजीनगर, कोथरूड, वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या चार विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी त्यांना दिली आहे. पूर्व पुण्यातील विविध राजकीय समीकरणे सांभाळत पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर असणार आहे.





