बारावीच्या पुस्तकातून ‘बाबरी’चा उल्लेख वगळला; एनसीईआरटीचा निर्णय

नवी दिल्ली – एनसीईआरटीने बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातील एका धड्यातून बाबरी मशिदीचे नाव वगळून टाकले आहे. आता नव्याने तयार करण्यात आलेल्या पुस्तकात बाबरी मशिदीचा उल्लेख तीन घुमटांची रचना असा केला आहे. यासोबतच अयोध्येवरील धडा देखील छोटा करत चार पानांवरुन दोन पानांवर आणला आहे.
यात भाजपची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, कारसेवकांचे आंदोलन, बाबरी मशीद पाडल्यानंतरचे आंदोलन, राष्ट्रपती राजवट तसेच अयोध्येत झालेल्या हिंसेवरून भाजपने व्यक्त केलेला खेद आदी गोष्टींचा समावेश आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या अभ्यासक्रमात यापेक्षा जास्त माहिती देण्यात आली होती. 16 व्या शतकात मोगल बादशाह बाबरचा सेनापती मीर बाकी याने बाबरी मशीद बांधली होती. तर नवीन धड्यानुसार 1528 रोजी राम जन्मभूमी असलेल्या ठिकाणी तीन घुमटांची एक रचना बांधण्यात आली.
मात्र, यावर अनेक हिंदू प्रतीके होती. याशिवाय आतल्या आणि बाहेरच्या भिंतींवर मूर्ती देखील होत्या. जुन्या पुस्तकात 1986 मध्ये फैजाबाद (आताचे अयोध्या) जिल्हा न्यायालयाने मशीद उघडायला परवानगी दिल्यानंतर कशाप्रकारे या प्रकरणाचे मोबिलायझेशन झाले, याचा उल्लेख आहे.
1992 मध्ये राम मंदिरासाठी काढण्यात आलेली रथयात्रा तसेच कारसेवकांमुळे धार्मिक तणाव निर्माण झाल्याचे म्हटले आहे. त्यानंतर 1993 मध्ये जातीय दंगली झाल्या. या सगळ्याबाबत आताच्या पुस्तकात मात्र वेगळाच उल्लेख आहे.
दरम्यान, एनसीईआरटीच्या पुस्तकात 2014 पासून चौथ्यांदा बदल केले जात आहेत. राजकीय परिस्थितीत होणाऱ्या बदलांनुसार अभ्यासक्रमात बदल केला जात असल्याचे एप्रिलमध्ये एनसीईआरटीने म्हटले होते.





