‘ब्लॅक फंगस’चा सर्वाधिक धोका पुरुषांनाच; तज्ज्ञांच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती उघड

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेसोबतच आता देशात म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे आहे. त्यातच या ब्लॅक फंगसचा धोका महिलांपेक्षा पुरुषांना अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरातील चार वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या ‘म्युकरमायकोसिस इन कोविड-१९-अ सिस्टमेटिक रिव्ह्यू ऑफ केसेस रिपोर्टेड वर्ल्डवाइड इन इंडिया’ या अभ्यास अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.
राष्ट्रीय पातळीवरील या अभ्यासाकरिता देशभरातील १०१ रुग्णांचा अभ्यास करण्यात आला आहे. १०१ रुग्णांच्या अहवालात ७९ पुरुष रुग्ण असल्याचे दिसून आले. त्यात १०१ पैकी ८३ रुग्णांच्या शरीरात साखरेची वाढलेली पातळी हा या आजारासाठी धोका ठरल्याचे निरीक्षण आढळून आले. हा अभ्यास अहवाल डॉ. अवदेश कुमार सिंग, डॉ. रितू सिंग, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. अनुप मिश्रा या तज्ज्ञांनी एकत्रितरीत्या केला आहे. या अभ्यास अहवालात ८२ भारतीय रुग्ण आणि ९ अमेरिकेतील, तर तीन इराणमधील रुग्णांचा समावेश होता.
राज्यात म्युकरमायकोसिसमुळे ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०१ रुग्णांपैकी ३१ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे, तर १०१ रुग्णांपैकी ६० म्युकरमायकोसिस रुग्णांमध्ये कोरोनाचे संक्रमणही आढळून आले आहे. त्याचप्रमाणे, ८३ रुग्णांना मधुमेह आणि ३ रुग्णांना कर्करोग असल्याचे दिसून आले.
डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, अहवालानुसार म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मधुमेह असल्यास मृत्यूचा अधिक धोका संभावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवली पाहिजे. त्याचप्रमाणे, कोविड रुग्णांच्या उपचार प्रक्रियेतही स्टेरोइड्सचा अतिवापर करणे टाळायला हवा असा सल्ला देखील यावेळी देण्यात आला आहे.





