Baramati : जुन्या-नव्या चेहऱ्यांच्या बेरजेला सभासदांचा कौल
Baramati : अनुभवी नेतृत्वाला कायम ठेवताना नव्या उमेदवारांना संधी देण्याची रणनीती, प्रतिस्पर्धी पॅनलची उभारणी आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा अशा विविध मुद्द्यांमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली.

वडगाव निंबाळकर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुपा-कोऱ्हाळे गट चार आणि होळ-मोरगाव गट क्रमांक तीनमधील निकालांनी सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने सुपा-कोऱ्हाळे गटात अनुभवी संचालक सुनील नारायण भगत यांच्यासह दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्यात तिन्ही जागांवर विजय मिळविला आहे. दुसरीकडे होळ – मोरगाव गटातही नव्या उमेदवारांना संधी देण्याची भूमिका घेतली. दोन्ही गटांतील निकालांमुळे कारखान्याच्या राजकारणात अजित पवार गटाची स्थिती भक्कम झाली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर झालेली सोमेश्वर कारखान्याची पहिली निवडणूक असल्याने या लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या पार्श्वभूमीवर खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्नांची मोट बांधली होती. अनुभवी नेतृत्वाला कायम ठेवताना नव्या उमेदवारांना संधी देण्याची रणनीती, प्रतिस्पर्धी पॅनलची उभारणी आणि स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा अशा विविध मुद्द्यांमुळे ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली.
गट क्रमांक चारमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनलने सुनील भगत, अक्षय खलाटे, राजेंद्र बोरकर यांना उमेदवारी दिली होती. तिन्ही उमेदवारांनी विजय मिळविला. भगत हे कारखान्याच्या संचालक मंडळातील अनुभवी नाव आहे. अक्षय खलाटे आणि राजेंद्र बोरकर यांना नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. सहकारात त्यांचे पाऊल संघटनबांधणीला पोषक ठरणार आहे.
खलाटे यांना १४ हजार ५०० मते तर राजेंद्र बोरकर यांनी १३ हजार ८९३ मते मिळविली. सुनील भगत यांना १३ हजार ७४३ मते मिळाली. तिन्ही उमेदवारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे.
भगत यांच्यासारख्या अनुभवी संचालकाला पुन्हा संधी देताना दोन नव्या उमेदवारांना सोबत घेण्याचा निर्णय पॅनलने समतोल साधला होता. त्यामुळे अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समतोल साधण्याचा प्रयत्न उमेदवारीतून दिसून आला. निकालातून सभासदांनी तिन्ही उमेदवारांना दिलेला कौल महत्त्वाचा ठरला आहे.
याच गटातील निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले. जगताप यांनी यापूर्वी अध्यक्षपदाची १३ वर्षे जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये माजी संचालक सचिन खलाटे, अनिल जगताप, गोरख खोमणे यांना संधी दिली होती. सचिन खलाटे हे यापूर्वी संचालक होते. त्यांना उमेदवारी दिली. अनिल जगताप, गोरख खोमणे यांना नव्या चेहऱ्यांच्या रूपात संधी मिळाली. जगताप यांनी भाजपशी हातमिळवणी करून स्वतंत्र पॅनल उभे केल्याची राजकीय चर्चा होती. त्यामुळे लढतीचे समीकरण अधिक गुंतागुंतीचे झाले.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, माजी पंचायत समिती सभापती पोपट पानसरे, शिवराज ऊर्फ प्रवीण पवार यांना उमेदवारी दिली होती. पॅनलमध्येही अनुभवी राजकीय व्यक्तींना संधी दिली. परिणामी, तीन वेगवेगळ्या पॅनलमधील नऊ उमेदवारांच्या लढतीत स्थानिक राजकीय प्रभाव, जुने संचालक आणि नव्या उमेदवारांची स्वीकार्हता यांची कसोटी लागली होती.
होळ-मोरगाव मतदारसंघातही अजितदादा पवार पॅनलने नव्या उमेदवारांना संधी दिली होती. पॅनलकडून रवींद्र भापकर, मकरंद सस्ते आणि मनीषा होळकर यांना उमेदवारी दिली होती.
रवींद्र भापकर हे लोणी भापकर गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विविध विकासकामांवर भर देणे, तळागाळातील नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध राखणे, ही त्यांच्या स्थानिक कार्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे त्यांची कारखान्याच्या निवडणुकीतील कामगिरी चर्चेत आली.
मकरंद सस्ते यांना १४ हजार ३३६ मते, तर रवींद्र भापकर यांना १२ हजार ७५ मते व मनीषा होळकर यांना ११ हजार ४२२६ मते मिळून विजयी झाले. गटात शरद पवार गटाकडून सुनीता कारंडे, हर्षद कोळकर, दत्तात्रय भिवा ढोले यांना उमेदवारी दिली होती. पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलकडून अमर होळकर, राहुल भापकर, वैभव गायकवाड हे उमेदवार रिंगणात होते. दोन्ही पॅनलमध्येही नव्या उमेदवारांना संधी दिली होती. मात्र, प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे होळ-मोरगाव गटातही उमेदवारांच्या निवडीपासून प्रचारापर्यंत नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरला.
पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनलमुळे निवडणुकीत अतिरिक्त राजकीय समीकरण निर्माण झाले होते. शरद पवार गटानेही स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरविल्याने मतदारांसमोर तीन पर्याय उपलब्ध होते. अशा परिस्थितीत मतांचे विभाजन, उमेदवारांचा वैयक्तिक जनसंपर्क, स्थानिक प्रश्न आणि पॅनलची संघटनात्मक ताकद हे घटक महत्त्वाचे ठरले. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत विजयी संचालक सभासदांच्या अपेक्षा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, या घटकांना कशा प्रकारे प्राधान्य देतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे.





