Melghat Accident News : अमरावती जिल्हातील मेळघाट परिसरात भीषण अपघात घडला असून मजुरांना घेऊन जाणारा पिकअप वाहन सुमारे ५० फूट दरीत कोसळल्याने सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना मेळघाटातील राणीघाट परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन घाटमाथ्यावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की सात मजूरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. काही मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली असून मदतकार्य सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग, रस्त्याची खराब अवस्था किंवा तांत्रिक बिघाड यांपैकी कोणते कारण जबाबदार आहे, याची चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेमुळे मेळघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.