वॉशिंग्टन : युक्रेनमधील शांततेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पत्र पाठवले आहे. अलास्का येथील भेटीदरम्यान ट्रम्प यांनी हे पत्र पुतीन यांना दिले आहे. रशियाने २०२२ मध्ये आक्रमण केलेल्या युक्रेनचा या पत्रामध्ये स्पष्ट उल्लेख नाही. भूमी, सरकार आणि विचारधारेपेक्षा अधिक महत्वाच्या असलेल्या लहान मुले आणि निरपराधांचा विचार करावा, अशी विनवणी या पत्रामध्ये करण्यात आली आहे. फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी आपल्या पत्रात युद्धाबाबत कोणतीही चर्चा केली नाही. मात्र पुतीन हे युद्धात सापडलेल्या या मुलांचे हास्य पुन्हा त्यांना एकहाती प्रदान करू शकतात, असे मात्र त्यांनी म्हटले आहे. या लहान मुलांच्या निरागसपणाचे रक्षण करून तुम्ही केवळ रशियाच्या सेवेपेक्षाही जास्त मानवतेची सेवा करू शकता, असे मेलानिया ट्रम्प यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळाने अमेरिकेचे अध्यक्ष आणि ऍटर्नी जनरल पाम बोंडी यांच्या सहकार्याने या पत्राची प्रत मिळवून सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. पुतीन पेनाच्या फटकाऱ्याने या मुलांना मदत करू शकतात, असेही मेलानिया ट्रम्प यांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनमधील मुलांना देशातून रशियामध्ये नेण्यात आले आहे. या मुलांना रशियाचे नागरिक म्हणून मोठे करता यावे, यासाठी त्यांना २०२२ मध्ये रशियामध्ये नेण्यात आले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर युद्धगुन्ह्याचा ठपका ठेवून त्यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. युक्रेनमधील बालकांच्या अपहरणासाठी पुतीन यांना वैयक्तिकपणे जबाबदार धरण्यात आले आहे.