“मेहुणे…मेहुणे…मेहुण्यांचे पाहुणे..!” तो’ व्हिडीओ ट्वीट करत मनसेनी साधला मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष निशाणा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने काल मोठी कारवाई केली. त्यांच्या मालकीचे ११ फ्लॅट ईडीने जप्त केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे मनसेकडून या सगळ्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला आहे. त्यातही मनसेकडून एका मराठी चित्रपटातली व्हिडीओ क्लिप ट्वीट करण्यात आली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटातली ही व्हिडीओ क्लिप असून त्यात जितेंद्र जोशीचा “मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे” हा डायलॉग दिसत आहे. या व्हिडीओसोबत “पाहुणे आले घरापर्यंत” असे कॅप्शन देखील संदीप देशपांडे यांनी ट्वीट केली आहे.
पाहुणे आले घरापर्यंत! pic.twitter.com/xgzydDxG1l
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 23, 2022
उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या ११ सदनिका ईडीनं जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या ११ सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. चा प्रकल्प असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यातून ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्यातून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.





