न्यायालयीन कारवाईनंतर मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण करू

अँटिग्वाच्या पंतप्रधानांचे भारताला आश्वासन
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेची कोट्यवधींची फसवणूक करून पलायन केलेल्या मेहुल चोक्सीने अँटिग्वाचे नागरिकत्व घेतले आहे. दरम्यान, मेहुल चोक्सीनं फसवणूक केली असून त्यासंदर्भातील पुरावे आम्हाला सापडले आहेत. सध्या त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही कोणतीही कारवाई करू शकत नाही. परंतु न्यायालयीन कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल,अशी माहिती अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्राऊन यांनी दिली. ब्राऊन हे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी एका वॄत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
भारतीय अधिकारी अँटिग्वामध्ये येऊन चोक्सीची चौकशी करू शकतात. यामध्ये आम्हाला कोणतीही समस्या नाही. परंतु सध्या त्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही, असं ब्राऊन म्हणाले. मेहुल चोक्सीने फसवणुक केल्याची माहिती आम्हाला असती तर त्याला अँटिग्वाचे नागरिकत्व कधीही दिले नसते. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यात येईल. आमच्या देशाची एक स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे आणि हे प्रकरण न्यायालयात असल्याने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असेही स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले.





