Mehbooba Mufti : 5 वर्षांनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी घेतली नायब राज्यपालांची भेट; केली ‘ही’ मागणी

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी पाच वर्षांत पहिल्यांदाच नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. मी काश्मिरी पंडितांच्या परतीची मागणी राज्यपालांकडे केली आहे असे या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की त्यांनी नायब राज्यपालांना एक पत्र दिले आहे, जे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पाठवण्यात आले आहे. ७४ हजारांहून अधिक विस्थापित काश्मीरी कुटुंबांपैकी अनेकांना परत यायचे आहे आणि त्यांना यामध्ये आपण मदत केली पाहिजे.
२०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच मेहबुबा नायब राज्यपालांना भेटल्या आहेत. त्या म्हणाल्या परत येणाऱ्या सर्व काश्मिरी पंडितांना त्यांच्या गृहजिल्ह्यात अर्धा कनाल जमीन देण्यात यावी. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत काश्मिरी पंडितांना दिलेल्या दोन नामांकित जागांच्या जागी त्यांची जागा राखीव ठेवण्यात यावी. काश्मिरी पंडितांना सन्मानाने आणि शांततेने परतण्यास मदत केली पाहिजे.
अमरनाथ यात्रेत सामान्य लोकांसोबतही काम केले पाहिजे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला सरकारी विधानसभेत कलम ३७० वर ठराव मंजूर करण्याऐवजी ट्यूलिप गार्डनमध्ये फिरत होते. आम्ही सर्वांना पत्र लिहिले आहे आणि जर उमर सरकार हे हलक्यात घेत असेल तर आम्ही काय करू शकतो. काश्मिरी पंडितांचे परतणे हा आमचा राजकीय अजेंडा असेल आणि सरकारसोबत आम्ही त्यांच्या परतीसाठीही काम करू. आम्ही आमचा अजेंडा आणण्यापूर्वी काश्मिरी पंडितांशी बोललो आणि त्यांच्या त्यात सूचना आहेत. आम्हाला काश्मिरी पंडितांना काश्मिरी समाजात परत समाविष्ट करायचे आहे.





