Meghna Gulzar Birthday: बॉलिवूडमधील संवेदनशील आणि प्रभावी दिग्दर्शिकांमध्ये मेघना गुलजार यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. साध्या, सरळ पण मनाला भिडणाऱ्या कथा पडद्यावर मांडणं हीच त्यांच्या चित्रपटांची खरी ताकद आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये भडक ड्रामा नसतो, तर वास्तव आयुष्यातील भावना, वेदना आणि सत्य प्रामाणिकपणे दाखवलेलं दिसतं. आज, १३ डिसेंबर रोजी मेघना गुलजार आपला ५२वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्या प्रसिद्ध कवी-गीतकार गुलजार आणि ज्येष्ठ अभिनेत्री राखी यांची मुलगी असल्या, तरी त्यांनी आपली वेगळी ओळख स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर निर्माण केली आहे. मेघना यांनी २००२ साली ‘फिलहाल’ या चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली. हा सिनेमा फारसा यशस्वी ठरला नाही. मात्र अपयशाने त्या खचल्या नाहीत. पुढील काही वर्षे त्यांनी जाहिराती आणि लहान प्रोजेक्ट्सवर काम करत आपलं कौशल्य अधिक पक्कं केलं. २०१५ साली आलेल्या ‘तलवार’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला नवं वळण दिलं. या चित्रपटानंतर मेघना या गंभीर आणि संवेदनशील विषय अत्यंत प्रभावीपणे मांडणाऱ्या दिग्दर्शिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. यानंतर आलेला ‘राजी’ हा चित्रपट त्यांच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमामुळे मेघनांसोबतच अभिनेत्री आलिया भट्टचंही नशीब पालटलं. आलियाने साकारलेली गुप्तहेराची भूमिका प्रचंड गाजली आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटानंतर दोघींची जोडी विशेष चर्चेत आली. ‘राजी’ नंतर मेघना यांनी ‘छपाक’ आणि ‘सॅम बहादुर’सारखे वास्तव घटनांवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केले. ‘छपाक’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण विषय हाताळण्याच्या पद्धतीचं कौतुक झालं. तर २०२३ मध्ये आलेल्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटासाठी मेघना गुलजार यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं. मेघना गुलजार या फक्त चित्रपट बनवत नाहीत, तर समाजाशी जोडलेल्या कथा अतिशय संवेदनशीलतेने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि म्हणूनच त्या आजच्या काळातील एक महत्त्वाच्या दिग्दर्शिका ठरतात.