मेघालय हनीमून हत्याकांड: सोनम रघुवंशी निर्दोष की कट रचणारी?

इंदौर : मेघालयात हनीमूनसाठी गेलेल्या इंदौरच्या राजा रघुवंशी यांच्या हत्येच्या रहस्यमयी प्रकरणात सोनम रघुवंशी मुख्य आरोपी म्हणून समोर आली आहे. ११ मे २०२५ रोजी झालेल्या या जोडप्याच्या विवाहानंतर अवघ्या १२ दिवसांत राजा यांचा मृत्यू आणि सोनम १७ दिवस बेपत्ता राहिल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोनमने आपल्या प्रियकर राज कुशवाहासह राजा यांच्या हत्येचा कट रचला की ती निर्दोष आहे? हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.
मेघालय पोलिसांनी सोनमला उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथील काशी ढाब्यावर ८ जून रोजी रात्री १ वाजता ताब्यात घेतले. याशिवाय, राज कुशवाह, विशाल चौहान आणि आकाश राजपूत यांना इंदौर आणि ललितपूर येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या मते, सोनमने आपल्या प्रियकर राज कुशवाहासह सुपारी देऊन राजा यांची हत्या घडवली. मेघालयातील वेई सॉडॉन्ग धबधब्याजवळ २ जून रोजी राजा यांचा मृतदेह खड्ड्यात सापडला होता. हत्येच्या वेळी सोनमसह तीन संशयितांना स्थानिक टूरिस्ट गाइडने पाहिल्याचा दावा केला आहे.
सोनमच्या चारित्र्याबाबत तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, ती सुशिक्षित, व्यवहारकुशल आणि साधी मुलगी आहे. ती आपल्या भावाच्या कंपनीत काम करत होती. राजा यांच्या आईनेही सोनमच्या गोड बोलण्याची आणि प्रेमळ वागण्याची प्रशंसा केली होती. मात्र, तिनेच मेघालयातील हनीमूनचे तिकीट बुक केले आणि राजा यांना तिथे जाण्यासाठी तयार केले, असा दावा त्यांच्या आईने केला. याउलट, सोनमचे वडील देवी सिंह यांनी तिला फसवल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
सोनम २३ मे ते ८ जूनपर्यंत कुठे होती, याचा तपास सुरू आहे. गाझीपूरच्या ढाब्यावर ती भयभीत अवस्थेत सापडली, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, तिच्या साथीदारांच्या अटकेनंतरच ती समोर आली. या प्रकरणात आणखी एका संशयित आनंद कुर्मी याचाही शोध सुरू आहे. मेघालय पोलिसांनी सात दिवसांत चार अटक केल्या असून, मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.


