ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू-सचिन तेंडुलकर यांची भेट; मीराने फोटो शेअर करत म्हटलं

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणाऱ्या मीराबाई चानूने नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. वेटलिफ्टर मीराबाईने सोशल मीडियावर सचिनसोबतचे फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. यावेळी सचिनने तिच्या मेडलची पाहणी करताना तिला शुभेच्छा दिल्या.
२६ वर्षीय मीराबाई चानू हिने ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २००० च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीने कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. भारताने या ऑलिम्पिकमध्ये १ सुवर्ण, दोन रौप्य व चार कांस्य अशी एकूण ७ पदकं जिंकली.
Loved meeting @sachin_rt Sir this morning! His words of wisdom & motivation shall always stay with me. Really inspired. pic.twitter.com/Ilidma4geY
— Saikhom Mirabai Chanu (@mirabai_chanu) August 11, 2021
मीराबाईने पदक जिंकल्यानंतर सचिननेही तिचे कौतुक केले होते. त्याने लिहिले होते की, मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. दुखापतीनंतर ज्या पद्धतीने तिने मेहनत घेत स्वतःला सावरले आणि ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकले, हे उल्लेखनीय आहे. भारताला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे.”
मीराबाईने स्नॅच प्रकारात पहिल्या दोन प्रयत्नांत ८४ व ८७ किलो वजन उचलले, परंतु तिसऱ्या प्रयत्नांत ८९ किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली अन् तिला दुसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. चीनच्या होऊ झिहूने ९४ किलो वजन उचलून ऑलिम्पिक रिकॉर्ड नोंदवला. मीराबाईने २०१७ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ८७ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले होते.





