पुणे जिल्हा | खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची सभा खेळीमेळीत

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची 86वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 29 सप्टेंबर) संस्थेच्या स्व. रतनचंद हरकचंद बाफना रंगमंदिराच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे मानद सचिव गणेश जोशी यांनी नियोजित वेळेत सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण झाल्याने अध्यक्ष हरीभाऊ सांडभोर यांच्या परवानगीने सभेस सुरुवात केली.
या सभेस सर्व संचालक उपस्थित होते
शैक्षणिक सुविधा आणि प्रशांबाबत संस्थेच्या सभासदांनी सभेतील चर्चेत भाग घेतला. विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 1 ते 6 एकमताने मंजूर करून संस्था एक चांगले प्रकारे काम करत असल्याचे सभागृहाने सांगितले.
ऐनवेळी येणार्या विषयांमध्ये संस्थेचे ज्येष्ठ सभासद शांताराम घुमटकर यांनी राजकीय व्यक्तींद्वारे शालेय क्रीडांगणावर घेतल्या जाणार्या वैयक्तिक सामाजिक कार्यक्रमांमुळे क्रीडांगणाची झालेली दुरवस्था निदर्शनास आणून दिली व यापुढे कोणासही वैयक्तिक सामाजिक कार्यक्रमांसाठी क्रीडांगण देण्यात येऊ नये, असे मत व्यक्त केले.
त्यास उपस्थित सभागृहाने एकमताने शालेय क्रीडांगण हे शासकीय व शालेय कार्यक्रम अथवा कामकाजा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कार्यक्रमास न देण्याचा ठराव सभेत एकमताने मंजूर केला. संस्थेचे उपाध्यक्ष अजित लुणावत यांनी उपस्थितांचे आभार मानले.





