पिंपरी | इंद्रायणीच्या स्वच्छतेबाबत देहूमध्ये बैठक

देहूगाव, (वार्ताहर) – इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिराच्या कार्यालयात रविवारी (दि. २) धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने बैठक घेण्यात आली. धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे समन्वय हभप भागवताचार्य दिनेश महाराज औटी, भंडारा डोंगर विश्वस्त हभप गजानन कराळे, ज्ञानदीप ट्रस्टचे हभप लक्ष्मण महाराज आरोटे,
सोनई आनंदाश्रमचे विश्वस्त हभप दिगंबर जाधव, श्री कृतज्ञता ट्रस्टचे हरिदास जायभाये, भामचंद्र डोंगर कृती समिती अध्यक्ष पोपट पवार, संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, देहू श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे हभप भावार्थ महाराज देखणे, नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पूजा दिवटे आदी यावेळी उपस्थित होते.
इंद्रायणी नदी घाटावरून नदी पात्रातील जलपर्णी व नदीत मिश्रित होणारे दूषित पाण्याची पाहणी केली. इंद्रायणी नदीपात्रामध्ये ओढ्या-नाल्यातून येणारे मैला मिश्रित दूषित सांडपाणी, कंपन्यांचे रासायनिक केमिकल मिश्रित दूषित पाण्यांना प्रथम आळा घालणे आणि नदीपात्र स्वच्छ करणे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेला येणाऱ्या अडचणी सोडविण्याम येणार आहे.
त्यासाठी लागणारे विविध साहित्य, समस्या शासन दरबारी मांडून त्याचे निराकरण करण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे काम करताना विविध सेवाभावी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, संस्थान, वारकरी, भाविक आणि ग्रामस्थांच्या समूहाने इंद्रायणी स्वच्छ करावयाच आहे. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास लवकरात लवकर नदी स्वच्छ करण्यास मदत होईल, असे आध्यात्मिक सेनाचे समन्वय हभप दिनेश औटी यांनी यावेळी व्यक्त केले.





