Meena River Flood: जुन्नरमध्ये निसर्गाचा कोप! मीना नदीच्या महापुरात शेळ्या, कोंबड्या वाहिल्या; वडज धरणातून १८ हजार क्यूसेक विसर्ग
Meena River Flood: सोमवार रात्रीपासून जुन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस; वडज धरणातून पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या विसर्गामुळे मीना नदीला आला महापूर.

Meena River Flood – जुन्नर तालुक्यात सोमवारी (दि. ७) रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे वडज धरणातून पहाटे ६ वाजता मीना नदीत १८ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या विसर्गामुळे मीना नदीला महापूर आल्याने खोडद परिसरात मोठे नुकसान झाले. खोडद येथील शेतकरी श्रीकांत आल्हाद आल्हाट यांच्या शेळीपालन प्रकल्पात पूराचे पाणी शिरल्याने शेळ्या, करडे, कोंबड्या वाहून गेल्या, तर सुमारे आठ लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.
महापुरामुळे काही काळ नारायणगाव–खोडद मार्गावरील वाहतूकही बंद ठेवावी लागली. श्रीकांत आल्हाट यांचा नारायणगाव–खोडद रस्त्यालगत १० गुंठे क्षेत्रात शेळीपालन (गोट फार्म) आहे. फार्ममध्ये ४५ शेळ्या, ४० करडे आणि २५ कोंबड्या होत्या. पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे पाच ते सहा फूट उंचीपर्यंत पाणी फार्ममध्ये शिरले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पाटील सुहास थोरात, संतोष काळे, तंटामुक्ती अध्यक्ष बबन एरंडे, शंकर थोरात,
रोहिदास डोके तसेच ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य हाती घेत २८ शेळ्या, ३० करडे आणि १० कोंबड्यांना सुरक्षित स्थळी हलविले. तथापि, १० शेळ्या, १० करडे आणि १५ कोंबड्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. तसेच दोन कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, दुधासाठी वापरण्यात येणारा फ्रिज, घरगुती धान्य आणि सुमारे ४५ हजार रुपयांचे पशुखाद्यही पाण्यामुळे नष्ट झाले. खोडद गावठाणातील बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला.
बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेला असून खोडद येथील स्मशानभूमीतील मुरूम व पत्र्याचे शेडही पुराच्या पाण्यात वाहून गेले. तसेच शेतकरी दिलीप शिंदे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये पाणी शिरल्याने शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला किंवा त्या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुहास थोरात, उपसरपंच योगेश शिंदे, ग्राममहसूल अधिकारी एन. जे. खान, ग्रामविकास अधिकारी सी. जी. मुठे तसेच नारायणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व मदतकार्याला गती दिली. पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





