Meena River Flood : वडज धरणातून १२ हजार क्युसेस विसर्ग ; मीना नदीला महापूर, पूल पाण्याखाली

प्रभात वृत्तसेवा
नारायणगाव – वडज धरण परिसरात पावसाने थैमान घातले असून धरणातून रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत १२ हजार क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता अशी माहिती कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर यांनी दिली. वडज धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने नारायणगावातील मीना नदीला महापूर आला असून नदीवरील नेवकर व मेहेर पूलासह अनेक लहान मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नारायणगाव व वारूळवाडी यांना जोडणाऱ्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात असून नदीकाठच्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. वारूळवाडीतील अमरधाम पाण्याखाली गेले आहे.
मीना नदीला आलेल्या महापुरामुळे प्रशासन सतर्क झाले असून नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे व वारूळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, जुन्नर तहसीलदार यांनी नागरिकांना नदीपात्राजवळ जाऊ नये असे आवाहन केले आहे. तालुक्यातील वडज धरणासह सर्वच धरणे शंभर टक्के भरल्याने धरणाच्या परिसरात मुसळधार पावसाची परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस अतिवृष्टी सांगितल्याने सतर्कता जारी करण्यात आला आहे, असे पाटबंधारे विभागाचे जयसिंग घालगे यांनी सांगितले.
धरणांची स्थिती..
• वडज – उपयुक्तसाठा १.१७१ टीएमसी, मीना नदीत १२,००० क्यूसेस विसर्ग
• येडगाव – उपयुक्तसाठा १.९४४ टीएमसी, कुकडी नदीत ७,२०० क्यूसेस विसर्ग
• डिंभे – उपयुक्त साठा १२.४९५ टीएमसी, घोड नदीत ३४,००० क्यूसेस विसर्ग
• पिंपळगाव जोगा – उपयुक्त साठा ३.८९० टीएमसी, पुष्पावती नदीत १,८०० क्यूसेस विसर्ग
• चिल्हेवाडी – उपयुक्त साठा ०.८०३ टीएमसी, मांडवी नदीत १,१०० क्यूसेस विसर्ग
• माणिकडोह – उपयुक्त साठा १०.१८० टीएमसी, ७६ टक्के भरले.





