World Tennis League | स्टार टेनिसपटू डॅनिएल मेदवेदेव ‘पुनित बालन’ समूहाचे करणार नेतृत्व …

नवी दिल्ली :– जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला स्टार टेनिसपटू डॅनिएल मेदवेदेव हा जागतिक टेनिस लीगमध्ये पुनित बालन समूहाच्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. (Medvedev to lead Punit Balan Group team in World Tennis League) पुनित बालन समूहाने शुक्रवारी स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात संघासह जागतिक क्रीडा क्षेत्रात प्रवेश केल्याची घोषणा केली. ही स्पर्धा 21 ते 24 डिसेंबर या कालावधीत अबुधाबीमधील यास बेटाच्या इतिहाद एरिना येथे होणार आहे. पुनित बालन समूहाच्या मालकीच्या संघाचे नाव पीबीजी ईगल्स असे आहे.
पुनित बालन समूहाने यापूर्वीच भारतातील विविध क्रीडा लीगमधील नऊ संघांमध्ये गुंतवणूक केली आहे आणि या गटात आता पॉवर-पॅक स्क्वॉड दिसेल, ज्यामध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेला आंद्रे रुबलेव्ह देखील भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.
जागतिक क्रीडा संपत्ती निर्माण करण्याच्या पुनित बालन समूहाच्या समर्पणात लक्षणीय प्रगती करत जागतिक टेनिस लीगचा एक भाग होण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. जगातील टेनिस प्रतिभांपैकी काही आधीच आमच्या फ्रॅंचायझीचा भाग आहेत, इतर क्रीडा विभागातील आमच्या यशाप्रमाणेच येथे विजेतेपद पटकावण्याचे आमचे ध्येय आहे, असे पुनित बालन समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी सांगितले.
भारतातील सर्व प्रमुख क्रीडा लीगमध्ये पुनिल बालन समूहाचे संघ आहेत. त्याचसोबत पुनित बालन समूह जवळपास 60 प्रतिभावान खेळाडूंना देखील सपोर्ट करतो.
पुनित बालन समुहाचे स्वागत करताना जागतिक टेनिस लीगचे अध्यक्ष राजेश बंगा म्हणाले, पुनित बालन समुह जागतिक टेनिस लीग परिवारात सामील झाल्यामुळे आम्ही त्यांचे हार्दिक स्वागत करतो. खेळांच्या वाढीसाठी आणि प्रचारासाठी त्यांचे समर्पण आमच्या ध्येयाशी संरेखित होते. लीगची पातळी उंचावण्याचे तसेच वर्षातील जागतिक दर्जाची टेनिस स्पर्धा बनवण्याचे वचन देते.
ग्रेटेस्ट शो ऑन कोर्ट
ग्रेटेस्ट शो ऑन कोर्ट म्हणून ओळखला जाणारा हा कार्यक्रम 125 हून अधिक देशांमध्ये प्रसारित केला जाईल आणि त्यात महिलांची जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची आरीना सॅबालेंका, 2023 ऑस्ट्रेलियन ओपनची अंतिम फेरीतील स्पर्धक स्टेफानो त्सित्सिपास आणि चार वेळा ग्रॅंड स्लॅम विजेती इगा स्विएटेक यांचाही समावेश असेल.
मेदवेदेवने 2021 साली अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली आणि या वर्षीच्या विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी गाठली. अबुधाबीमध्ये होणाऱ्या लीगमधून वर्षाच्या उत्कृष्ट कामगिरी करण्याकडे त्याचे लक्ष असेल. मेदवेदेव याने भारतीय संघाकडून खेळण्याचा आपला उत्साह शेअर केला. तो म्हणाला, गेल्या वर्षी या लीगमध्ये खेळाडूंनी काय अनुभवले ते पाहिल्यानंतर, अबुधाबी येथील जागतिक टेनिस लीगच्या या हंगामात सहभागी होताना मला आनंद होत आहे. मी यूएईमध्ये अनेक वेळा खेळलो आहे आणि येथे परत येण्याचा मला नेहमीच आनंद वाटतो.





