MCOCA Arrest : यवत पोलिसांचा मोठा दणका! १० घरफोड्या उघड, मोक्कातील ‘तो’ सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद
MCOCA Arrest : उंब्रज आणि शिरूरमधील दोन मोक्का गुन्ह्यांत फरार असलेला मुख्य सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात; अहिल्यानगरमधील सराफालाही अटक.

MCOCA Arrest – यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना यवत पोलिसांनी मोठी कारवाई करीत सराईत आरोपींना अटक केली आहे. कारवाईत घरफोडी चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले. मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रुकुल ऊर्फ अमर दशरथ चव्हाण (वय ३१, रा. न्हावरा ता. शिरूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याचे साथीदार महेश भोसले (वय २२, रा. गुंडेगाव, जि. अहिल्यानगर) व अमोल भोसले (वय २०, रा. न्हावरा ता. शिरूर) यांना अटक केली. (दि.६) जानेवारी रोजी पहाटे ५.१५ वाजण्याच्या सुमारास मौजे वाखारी (ता. दौंड) येथे फिर्यादी यांच्या घराचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
किचनमधील कपाटातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण १ लाख ९८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. सांवत सुभाष शेळके यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करीत होते. तपासादरम्यान यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
बातमीदारांमार्फत माहिती गोळा करून आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड व विकास कापरे यांना माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून संशयित आरोपींना ताब्यात घेतले.ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार,
दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक महेश माने, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संपकाळ, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, मारोती मेतलवाड, गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.
उंब्रज, शिरूरमध्ये मोक्काची कारवाई
तपासादरम्यान आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीत ६ ठिकाणी व उरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत ३ ठिकाणी घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे एकूण १० घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींनी अहिल्यानगर येथील सराफ दुकानदार किरण विलास बुऱ्हाडे (वय ४६, रा. माळीवाडा, जि. अहिल्यानगर) यास विकल्याची कबुली दिल्याने त्यालाही या गुन्ह्यात आरोपी करून अटक केली आहे.
मुख्य आरोपी चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी चोरी, दरोडा, जबरी चोरी व आर्म ॲक्टचे एकूण १० गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील उंब्रज व पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस स्टेशन येथे मोक्का ॲक्ट अंतर्गत कारवाई केलेली आहेत. तो दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये फरार होता. त्याला जेरबंद करण्यात यवत पोलिसांना यश आले आहे.






