पिंपरी | पवना चौकातील मजूर अड्डा ठरतोय वाहतूककोंडीचे कारण

कामशेत, (वार्ताहर) – येथील पवना चौकात गेले काही वर्षांपासून मजूर अड्डा अस्तित्वात आला आहे. या मजूर अड्ड्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत असून त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर बाधित होत आहे. हा मजूर अड्डा दुसरीकडे स्थलांतरित करावा, अशी मागणी आता नागरिक करत आहेत.
कामशेत शहरातील पवनानगर फाट्यावर हा मजूर अड्डा आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत असणाऱ्या सेवा रस्त्यावरील मजूर अड्ड्यामुळे वाहतूकीला मोठा अडथळा निर्माण होतो. मजूर वर्ग अर्धा अधिक रस्ता अडवून ठेवतात.
तसेच वाहने आली तर लवकर बाजूलाही होत नाहीत. सकाळच्या सुमारास तर गर्दीला पारावार उरत नाही. तसेच यावेळी वाहतूक नियोजनासाठी सहसा पोलिस बांधवही उपस्थित नसतात, त्यामुळे येथील वाहतूककोंडी नित्याची बनत चालली आहे.
पवनानगर भागात जाणारी वाहने याच चौकातून ये-जा करत असतात. तसेच पवना चौकाच्या बाजूला महामार्गालगत अनेक दवाखाने, दुकाने आणि छोटमोठे व्यवसाय आहेत, त्यामुळे तिथे येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असते.
त्यात हा सेवा रस्ता छोटा असून त्यावरही वाहने पार्क केलेली दिसतात. दुसरीकडे कामशेतकडे जाण्यासाठी महामार्गावर उभारण्यात आलेला नवा पूल देखील एखाद्या बोळीसारखा असल्याने तिथे वाहने अडकल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास येथे होणारी वाहतूककोंडी वाहनचालकांसाठी अतिशय त्रासदायक ठरत आहे.
कामशेतचा हा पुल आता लवकर सुधरवला जाईल, अशी चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे किमान येथील मजूरअड्डा दुसरीकडे स्थलांतरित करावा, सेवा रस्ता अधिक मोकळा करून तिथे योग्य नियोजन करावे या काही सर्वसाधारण मागण्या येथील नागरिक, प्रवासी आणि वाहनचालक करत आहेत.
यासह महामार्गवरून जाणारी वाहने ही अतिवेगात असतात, त्यामुळे एखादे वाहन अंगावर पडल्यास गंभीर अपघातही होऊ शकतो, त्यामुळे मजूर अड्डा स्थलांतरित होणे आवश्यक आहे. सोबतच प्रवाशांसाठी सुयोग्य बस थांबा, खासगी जीप चालकांना ठराविक जागा करून देणे, भाजी विक्रेत्यांसाठी नियमावली बनविणे हेही प्रश्न महत्वाचे आहेत.





