Mayuri Wagh : मयुरी वाघचे 20 वर्षानंतर रंगभूमीवर पुनरागमन; नव्या नाटकातून येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Mayuri Wagh : मयुरीसोबत शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका

Mayuri Wagh : अभिनेत्री मयुरी वाघ ‘अस्मिता’ या मालिकेतून घराघरात पोहचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. मात्र आता तब्बल २० वर्षांनंतर ती पुन्हा एकदा रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. विजय केंकरे दिग्दर्शित ‘२३वा मजला’ या नव्या नाटकातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या नाटकाच्या निमित्ताने मयुरी वाघ पुन्हा एकदा रंगभूमीशी जोडले जाण्यासाठी उत्सुक आहे. मयुरी म्हणाली की, “जवळपास २० वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.
टेलिव्हिजनवर काम करताना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं, पण रंगमंचावर थेट प्रेक्षकांसमोर अभिनय करण्याचा अनुभव वेगळाच असतो. ‘२३वा मजला’च्या निमित्ताने मला पुन्हा हा अनुभव घेता येणार आहे. विजय केंकरे सरांसोबत काम करण्याची मी आतुरतेने वाट पाहतेय. प्रेक्षकांनाही हे नाटक नक्की आवडेल, अशी आशा आहे.”
View this post on Instagram
‘२३वा मजला’च्या माध्यमातून मयुरी वाघ पुन्हा एकदा रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडण्यासाठी सज्ज झाली आहे. यात मयुरीसोबत शशांक केतकर आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
३१ ऑक्टोबरला होणाऱ्या पहिल्या प्रयोगापासून तिच्या या नव्या रंगमंचीय प्रवासाला सुरुवात होणार आहे. टेलिव्हिजनवर काम करताना वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारण्याची संधी तिला मिळाली. आता पुन्हा एकदा रंगमंचावर अभिनय सादर करताना पाहण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक आहेत.
दरम्यान, मयुरी वाघने ‘अस्मिता’ या मालिकेसह ‘लव्ह लग्न लोचा’, ‘ती फुलराणी’ आणि ‘आशीर्वाद तुझा एकवीरा आई’ यांसारख्या मालिकांमधूनही काम केले आहे.





