Mayureshwar: मोरगावात भाद्रपद यात्रेचा उत्साह ; मयुरेश्वराच्या जलाभिषेकासाठी भाविकांची अलोट गर्दी
Mayureshwar:

Mayureshwar: अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वराच्या भाद्रपद यात्रा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो गणेशभक्त मोरगावमध्ये दाखल झाले असून, ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.
भाद्रपद यात्रेचे खास आकर्षण म्हणजे भाविकांना श्री मयुरेश्वराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून गणरायाला स्वतःच्या हाताने जलाभिषेक करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे बाप्पाचे जवळून दर्शन आणि जलाभिषेक करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मोरगाव हे अष्टविनायक यात्रेतील पहिले स्थान मानले जाते. त्यामुळे याठिकाणी वर्षभर गणेशभक्तांची वर्दळ असते. मात्र, भाद्रपद आणि माघ महिन्यातील यात्रा हा मोरगावच्या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवातील विशेष काळ मानला जातो. या यात्रेसाठी पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून भाविक मोठ्या संख्येने येतात.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भाविकांच्या दर्शनासाठी आणि जलाभिषेकासाठी नियोजन करण्यात आले आहे. वाढती गर्दी लक्षात घेता सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, पहाटेपासून दर्शनासाठी लागलेल्या रांगा, बाप्पाच्या जयघोषाने भारलेले वातावरण आणि मयुरेश्वराच्या जलाभिषेकासाठी भाविकांची सुरू असलेली लगबग यामुळे मोरगावमध्ये सध्या भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे.






